दिवाळीच्या पर्वात एसटीचे चाक थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 12:07 AM2021-11-03T00:07:28+5:302021-11-03T00:09:13+5:30
राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलगीकरण व्हावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा फटका भंडारा विभागाला बसत आहे. भंडारा विभागांतर्गत गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात सहा आगार असून मंगळवारी तुरळक बसेस वगळता सर्व बसेस ठप्प होत्या. शनिवारी तुमसर आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर रविवारी तिरोडा आणि गोंदिया आगारातील कर्मचारी संपावर गेले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या पर्वात संपाचे हत्यार उचलले असून मंगळवारी भंडारा विभागातील सहाही आगारातील बससेवा ठप्प झाली होती. दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे यामुळे मोठे हाल होत असून संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. वरिष्ठ पातळीवर संप मागे घेण्यासाठी बाेलणी सुरू असून तूर्तास यश आल्याचे दिसत नाही.
राज्य महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलगीकरण व्हावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. याचा फटका भंडारा विभागाला बसत आहे. भंडारा विभागांतर्गत गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात सहा आगार असून मंगळवारी तुरळक बसेस वगळता सर्व बसेस ठप्प होत्या. शनिवारी तुमसर आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर रविवारी तिरोडा आणि गोंदिया आगारातील कर्मचारी संपावर गेले. तर मंगळवारी विभागातील सहाही आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उचलले आहे.
भंडारा विभागातून दररोज साधारणतः १२०० फेऱ्या होतात. मात्र मंगळवारी केवळ ६३ फेऱ्याच झाल्या. त्यात साकोली आगार ३३ फेऱ्या, पवनी ५, भंडारा २५ फेऱ्यांचा समावेश आहे. बाहेरगावावरून दिवाळीनिमित्त येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
बसस्थानकावर मोठी गर्दी दिसत आहे. नागपूरवरून भंडारा येथे पोहचलेल्या प्रवाशांना तालुकास्थळी आपल्या गावी पोहचणे कठीण जात आहे. याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे नाही - सुनील मेंढे
- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. तुटपुंज्या पगारात कुटुंब चालविणे अवघड झाल्याने नेमक्या दिवाळीत त्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागते. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी दिला. येथील एसटी वर्कशाॅप समोर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला असून आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रोशन काटेखाये, अनुप ढोके, शैलेश मेश्राम, शीव आजबले, अतुल वैरागडकर यांच्यासह भंडारा आगाराचे सर्व वाहक, चालक आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
खासगी वाहतूकदारांची चांदी, दर वाढविले
- एसटी महामंडळाचा संप असल्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. तिकिटांमध्ये दुप्पट वाढ केली आहे. बसस्थानकावर बाहेरगावावरून येणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसत आहे. लहान मुले आणि महिलांचे दिवाळीच्या पर्वात हाल होत आहेत. अधिक पैसे देऊन खासगी वाहनाने जात आहेत.
भंडारा विभागात दररोज ४५ लाखांचे नुकसान
- कोरोना संसर्गामुळे डबघाईस आलेली एसटी महामंडळाची चाकी आता कुठे धावू लागली होती. त्यातच दिवाळीचा सिझन म्हणजे एसटी महामंडळासाठी पर्वणी असते. या काळात एसटीला सर्वाधिक उत्पन्न होते. परंतु कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्याने सर्व बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे महामंडळाच्या भंडारा विभागाला दररोज ४५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आधीच आर्थिक डबघाईस असलेले महामंडळ यामुळे रसातळाला जाण्याची शक्यता आहे.