थबकलेली रेल्वेची चाके पुन्हा धडधडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:24+5:30
आता १ ऑक्टोबरपासून रेल्वेचा प्रवास खुला करण्यात आला आहे. मुंबई - हावडा मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू होणार आहेत. प्रवास करण्यासाठी जुने दर कायम असून जुन्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. कोरोना काळात प्रवास करण्यास असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळणार असून केव्हाही आणि कुठेही प्रवास करण्याची मुभा राहणार आहे.
तथागत मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : कोरोना संसर्गामुळे दीड वर्षांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अनियमित आहे. यामुळे प्रवाशांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने १ ऑक्टोबरपासून थबकलेल्या प्रवासी रेल्वे गाड्याची चाके रेल्वे रुळावर धावणार आहेत. जुने दर व वेळापत्रकानुसार गाड्या धावणार असल्याने प्रतीक्षेत असलेले प्रवासी सुखावले आहेत.
प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेची ओळख आहे. स्वस्त व सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे ओळखली जातो. कोरोनाच्या प्रभावामुळे मार्च २०२० पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास बंद होता. दरम्यानच्या काळात काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू झाली. तिकिटाचे दर, नियम व अटी आणि सामान्य प्रवाशांना असलेल्या बंदीमुळे प्रवास करणे परवडत नव्हते. रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्या तुरळक होती. सामान्य तिकीट विक्री बंद असल्याने अनेकांना प्रवास करणे महागात पडत होते. कोरोना काळात नियमित तिकिटाचे दर वाढल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत होता.
आता १ ऑक्टोबरपासून रेल्वेचा प्रवास खुला करण्यात आला आहे. मुंबई - हावडा मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू होणार आहेत. प्रवास करण्यासाठी जुने दर कायम असून जुन्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. कोरोना काळात प्रवास करण्यास असलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळणार असून केव्हाही आणि कुठेही प्रवास करण्याची मुभा राहणार आहे.
रेल्वे प्रवास बंदीच्या काळात अनेक संकटाचा सामना करावा लागला. नोकरीनिमित्त प्रवास करणे अवघड झाले होते. सामान्य प्रवाशांना बंदी व तिकिटाचे वाढीव दरामुळे आर्थिक नुकसान होत होते. सामान्य लोकांसाठी रेल्वे पूर्ववत सुरू होणार असल्याने प्रवाशांना संजीवनी मिळणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघाचे प्रा. बबन मेश्राम, व्यापारी संघाचे सुधीर बागडे, संजय मिरासे, वैद्यकीय संघटनेचे अतुल भोवते, मोबाईल विक्रेता संघाचे विवेक मोटघरे, किराणा दुकान संघटनेचे नवीन पशिने व सचिन बन्सोड यांनी दिली.
भंडारा रोड येथून धावणार १०८ गाड्या
- मुंबई-हावडा मार्गावर असलेल्या भंडारा रेल्वे स्थानकावरून दररोज १०८ प्रवासी गाड्या धावणार आहेत. यापैकी ६२ गाड्यांचा थांबा भंडारा रोड रेल्वे स्थानकावर नाही. नियमित थांबा असणाऱ्या ४६ प्रवासी गाड्या आहेत. यात ६ लोकल गाड्या आहेत. ४ लोकल गाड्या इतवारी ते गोंदिया दरम्यान धावत असून एक लोकल तिरोडी व एक रायपूरपर्यंत धावणार आहे.
रेल्वे फाटकावर ताण
- तिसऱ्या रेल्वे रुळाचे काम सुरू असल्याने वाहनांची वर्दळ रेल्वे फाटक परिसरातून सुरू आहे. रेल्वे फाटकामुळे वाहतुकीसाठी अडचण वाढली आहे. १ तारखेपासून रेल्वे गाड्यांची संख्या दुपटीने वाढणार असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होणार आहे. पुढील एक महिनाभर रेल्वे फाटकावर ताण पडणार असून स्थानिक पोलीस प्रशासनाची तारांबळ होणार आहे.