भंडाऱ्यात महामार्गाचे विस्तारीकरण केव्हा?
By admin | Published: January 4, 2016 12:31 AM2016-01-04T00:31:16+5:302016-01-04T00:31:16+5:30
वर्षामागून वर्ष लोटत आहे, मात्र भंडारा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे रूंदीकरण अजुनही झालेले नाही.
शशिकुमार वर्मा भंडारा
वर्षामागून वर्ष लोटत आहे, मात्र भंडारा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे रूंदीकरण अजुनही झालेले नाही. महामार्गाचे विस्तारीकरण केव्हा होईल या बाबीला घेऊन जिल्हा पोलिस प्रशासन तथा जिल्हा प्रशासनातील विविध विभाग अनभिज्ञ आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण हा विषय जिल्हा प्रशासनाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असलयने अधिकारी विचार करण्यापलिकडे कुठलेही ठोस पाऊले उचलू शकत नाही.
भंडारा शहरातून गेलेला हा जवळपास ९ किलोमीटरचा रस्त्याचे रूपांतर ‘फोरलेन’मध्ये न झाल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंगणिक गंभीर रूप धारण करित आहे. मुजबी ते शिंगोरी मार्गाचे विस्तारीकरण न होणे ही मुळ समस्या आहे. या समस्यावर अजुनही निर्णय घेण्यात आलेला नाही.
या विषयाला घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाची चिंता वाढली आहे. ‘फोरलेन’च्या कामासाठी वनविभागाची मंजुरी आडकाठी यासह अन्य तांत्रिक कारणे कारणीभूत आहेत. यामुळेच भंडारा ते देवरी मार्गावरील काही भागाचे विस्तारीकरणाची कामे अपूर्ण आहेत.
मुजबी ते शिंगोरीपर्यंतचा ९ किलोमीटरचा रस्ता तांत्रिक कारणांचा बळी ठरला आहे. जिल्हा प्रशासन तथा महामार्ग प्राधिकरण यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशिल असले तरी यावर अजुनपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करताना ते शहरातून होणार की ‘बायपास’चा मार्ग निवडणार? या प्रश्नाचे उत्तरही गुलदस्त्यात आहे. यावर भविष्यात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.
टप्प्याटप्याने झाले ‘फोरलेन’चे बांधकाम
मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्गाच्या भंडारा जिल्ह्यातील विस्तारीकरणाचे काम अशोका बिल्डकॉन नामक कंपनीने सन २००७ मध्ये त्याच्या सहयोगी कंपनी अशोका हाईवे (भंडारा) ने केले. यांतर्गत महाराष्ट्र राज्याची सीमा ते छत्तीसगढ राज्यातील असे एकूण ३५४.०२ किलोमीटर लांब मार्गाचे ‘फोरलेन’मध्ये बांधकाम करण्याचे ‘पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप’ अंतर्गत होते. नागपूर येथील पारडी ते भंडारा यानंतर भंडारा ते देवरीपर्यंच्या जवळपास १५० किलोमीटर रस्त्याच्या ‘फोरलेन’ विस्तारीकरणाचे काम प्रत्यक्षरित्या चार वर्षांपूर्वी टप्प्याटप्याने पूर्ण करण्यात आले. याअंतर्गत पारडी ते भंडाराजवळील मुजबीपर्यंत आणि शिंगोरी ते देवरीपर्यंत ‘फोरलेन’चे काम पूर्ण करण्यात आले. मात्र मुजबी ते शिंगोरीपर्यंतच्या ९ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम आजही अपूर्ण आहे.े
भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेला आहे. महामार्ग असल्याने जडवाहतुकीसह अन्य वाहनधारकांची प्रचंड वर्दळ असते. भरधाव वाहनांमुळे लहान वाहनधारकांसह यायी जाणाऱ्या वाहनचालकांचा जीव धोक्यात असतो. मुजबीनंतर महामार्गाचे विस्तारीकरण झाल्याने नागपुरला पोहचायला फक्त एक तासांचा अवधी लागतो. याच कारणांमुळे शहरातूनही वाहनांची गती कमी होत नाही. परिाणमी नियंत्रण बिघडल्याने अनेक लहानमोठे अपघात घडले आहेत.