तुमसर-बपेरा मार्गावरून जाताना जीव असतो मुठीत
By राहुल गायकवाड | Published: May 22, 2024 03:16 PM2024-05-22T15:16:20+5:302024-05-22T15:17:15+5:30
विभागाचे दुर्लक्ष: जड वाहतुकीने रस्त्याची झाली चाळण
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बपेरा-तुमसर राज्य मार्गावर जड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी रस्त्यावरून पादचाऱ्यांना व दुचाकी वाहन चालविणाऱ्या नागरिकांना पदोपदी मृत्यू जवळ आल्याचा भास होत आहे.
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या बपेरा परिसराला बावनथडी व वैनगंगा नदीचे वरदान लाभले आहे. परिणामी, दिवसरात्र रस्त्यावरून रेतीचे ओव्हरलोड ट्रक धावत असतात. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर गावातील घरे राज्यमार्गालगत असल्याने नागरिक आणि लहान मुलांचा संचार असतो. राज्य मार्गावरून वाहनांची भरधाव वर्दळ सुरू राहत असल्याने अपघाताची जणू श्रृंखला सुरू राहते. मात्र, अद्यापपर्यंत राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आलेला नाही.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला हस्तांतरित झाल्याने संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरून अनेक वेळा आमदार, खासदार, मंत्रीही प्रवास करतात. मात्र, त्यांच्या ताफ्यालाही खड्डे समजत नाही काय, हा प्रश्न आहे. राज्यमार्ग खड्यात गेला असल्याने नागरिकांत आक्रोश आहे. या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हा रस्ता आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाला हस्तांतरित झाल्याने या रस्त्याबद्दल उत्तराला मी बांधील नाही, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता चौधरी यांनी दिले. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांत व वाहनचालकात कमालीचा असंतोष आहे. या असंतोषाला बांधकाम विभागामुळे खतपाणी मिळत आहे. परिणामी असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसर सिहोरा-बपेरा परिसरात असणारे मार्ग व रस्ते सामान्य जनतेला ये-जा करताना त्रासदायक ठरत आहेत. या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी प्रशासनाची उदासीनता दिसून येते. संबंधित विभागाने तत्काळ लक्ष द्यावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर.