विरली केंद्रावर बारदाना येणार तरी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:53 PM2018-11-24T21:53:44+5:302018-11-24T21:54:04+5:30
गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. दरम्यान या केंद्रावर बारदाना येणार तरी केव्हा? असा परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.
पंचशील सहकारी धान गिरणी मासळच्या वतीने विरली (बु.) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोदामात आधारभूत धान खरेदीसाठी उपकेंद्र सुरु करण्यात आले. या उपकेंद्रावर बारदाणा असेपर्यंत ५९ शेतकऱ्यांच्या १ हजार ८९० क्विंटल ४० किलो धानाची खरेदी करण्यात आली. मात्र १५-२० दिवसांपूर्वी या केंद्रावरील बारदाना संपल्यामुळे धान खरेदी बंद झाली. या केंद्रावर बारदाणा येण्याची चिन्हेच दिसत नसल्याने आणि पैशांची नितांत गरज असल्याने शेतकऱ्यांवर पडीक दराने व्यापाऱ्यांना आपला धान विकण्याच पाळी आली आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची चलती असून शेतकऱ्यांची लूट सुरु आहे.
या खरेदी केंद्राच्या एजंट संस्थेचे अध्यक्ष हरगोविंद नखाते वारंवार दोन दिवसात बारदाणा येईल असे आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत. असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे या प्रकारासाठी एजंट संस्थेचा भोंगळ कारभार कारणीभूत असण्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
दरम्यान आज ना उद्या बारदाणा येईल आणि धान खरेदी पूर्ववत सुरु होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांचे हजारो पोती धान खरेदी केंद्राच्या प्रांगणात उघड्यावर पडून आहेत. या उघड्यावरील धानाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असून केंद्रावर चौकीदार नेमण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
जिल्हा पणन अधिकारी अनभिज्ञगेल्या १५-२० दिवसांपासून बारदाण्याअभावी हे धान खरेदी केंद्र बंद पडले असताना जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे मात्र यावषियी अज्ञानात आहेत. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आॅनलाईन खरेदीचा हवाला देवून सदर केंद्र सुरु असल्याचे ठामपणे सांगितले.
त्यामुळे त्यांना या केंद्रावर बारदान्याची गरज असल्याची मागणी केंद्रचालकांनी केली की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे गेल्या १५ दिवसांपासून दररोजच्या अपडेटमध्ये १ हजार ८९० क्विंटल ४० किलोची खरेदी दिसत असताना सदर केंद्रावर खरेदी सुरु आहे की बंद, हे जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही असा प्रश्नही निर्माण होतो. शेतकºयांच्या समस्येकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींकडेही वेळ नाही, ही बाब खरी ठरली आहे.
या केंद्रावर धान खरेदी सुरु असल्याचे सांगून जिल्हा पणन अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या केंद्रावर मिलर्सकडून आलेला बारदाणा वापरण्यायोग्य नसल्याने तो परत करण्यात आला. लवकरच चांगला बारदाणा येईल आणि केंद्र पूर्ववत सुरु होईल.
-हरगोविंद नखाते, अध्यक्ष, पंचशील सह. धान गिरणी मासळ.
नुकतेच मिलर्ससोबत बोलणे झाले आहे. उद्यापर्यंत सदर केंद्रावर बारदाणा पोहचेल आणि धान खरेदी पूर्ववत सुरु होईल.
-गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा