युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 05:00 AM2022-03-05T05:00:00+5:302022-03-05T05:00:35+5:30

डेनिफर येथून निघाल्यानंतर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर बसची तपासणी करण्यात आली. युक्रेनियन सैनिक बस थांबवून प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी करीत होते. भारतीय तिरंगा दाखवा तसेच भारतीय पासपोर्ट दाखविण्याची ते मागणी करीत होते, डेनिफर शहरातून बस निघाल्यानंतर युक्रेनियन सैनिकाने पहिल्याच चेकपोस्टवर मोबाईल ऑफ करा, फोटो काढू नका, असे बजावले. प्रवासादरम्यान एकही फोटो काढायचा नाही, असा आदेश प्रत्येक चेक पोस्टवर सैनिक देत होते.

When the siren of war sounded, the country was remembered | युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची

युद्धाचा सायरन वाजला की मायदेशाची आठवण यायची

Next

मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : युद्धाचा सायरन वाजला की हृदयात धडधड व्हायची. मिसाईल, बॉम्ब वर्षावाच्या धुराने आकाश काळेकुट्ट दिसायचे. कानठाळ्यात बसविणारा आवाज व्हायचा. आपले काय होणार, अशी भीती वाटायची अन् मायदेश भारतभूमीची आठवण यायची, असे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद संतोष ठवकर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
१३०० किलोमीटरचा प्रवास करून तो रोमानियात पोहचला असून तेथील एका शिबिरात सुरक्षित असल्याने त्याच्या पालकांना दिलासा मिळाला आहे.तुमसर तालुक्यातील खापा येथील विनोद ठवकर हा विद्यार्थी युक्रेनमधील डेनिफर शहरात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. तीन महिन्यापुर्वी तो युक्रेन येथे गेला होता. ६ मार्च रोजी भारतात परतही येणार होता. मात्र रशिया आणि युक्रेन  देशात युद्ध सुरू झाले आणि तो अडकला. तेथील थरार अनुभव सांगताना ऐकणाऱ्याच्या अंगावरही काटा उभा राहतो.
विनोद म्हणाला, युद्ध सुरू होतास दुतावासाने महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून आमची माहिती घेतली. भारतीय दुतावास महाविद्यालय प्रशासनात चर्चा झाली. दोन दिवसापुर्वी युक्रेनच्या डेनिफर शहरापासून रोमानियाच्या सीमेपर्यंत पोहचायचे होते. हे अंतर १३५० किलोमीटरचे आहे. यासाठी महाविद्यालयीन प्रशानाने विद्यार्थ्यांना बसची व्यवस्था करून दिली. युद्धाच्या छायेत आम्ही असे बसे रोमानियाच्या सीमेपर्यंत पोहचलो. सध्या एका राहत शिबिरात आश्रय घेतला असून दोन तीन दिवसात आम्ही देशात परतू, असे त्याने सांगितले. इकडे खापा येथे त्याचा परिवार कधी एकदा विनोद घरी परततो याची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहे. नातेवाईकही सतत वडील संतोष ठवकर यांच्या संपर्कात असून ते मुलांची ख्याली खुशाली विचारत आहेत. सर्व जण धीरही देत आहेत.

प्रत्येक ५० किलोमीटरवर झाली तपासणी
- डेनिफर येथून निघाल्यानंतर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर बसची तपासणी करण्यात आली. युक्रेनियन सैनिक बस थांबवून प्रत्येक विद्यार्थ्यांची चौकशी करीत होते. भारतीय तिरंगा दाखवा तसेच भारतीय पासपोर्ट दाखविण्याची ते मागणी करीत होते, असे विनोदने सांगितले. 
मोबाईल ऑफ करा, फोटो काढू नका
- डेनिफर शहरातून बस निघाल्यानंतर युक्रेनियन सैनिकाने पहिल्याच चेकपोस्टवर मोबाईल ऑफ करा, फोटो काढू नका, असे बजावले. प्रवासादरम्यान एकही फोटो काढायचा नाही, असा आदेश प्रत्येक चेक पोस्टवर सैनिक देत होते.

सीमेवर व्यवस्था 
- युद्धसदृष्य परिस्थितीतून कसेबसे आम्ही रोमानियाच्या सीमेवर पोहचलो. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी संपर्क साधून एका राहत शिबिरात आमची व्यवस्था केली. राहण्याची, भोजनाची व्यवस्था आहे. आता ऑपरेशन गंगा अभियानांतर्गत दोन दिवसात आम्ही भारतात पोहचू, असे विनोदने सांगितले. 

वडिलांशी दररोज संपर्क
- युद्ध सुरू झाले तेव्हापासूनच नाही तर युक्रेनला गेलो तेव्हापासून आपण दररोज वडिलांशी बोलत होताे. युद्ध सुरू झाल्यानंतर दररोज चर्चा करून वडिलांना मीच धीर देत होतो. परंतु कधी एकदा भारतात परततो, असे मला झाले होते. आता दोन दिवसात भारताच्या भूमिवर पोहचेल, असे विनोद ठवकर यांने सांगितले.

विमान न मिळाल्याने प्रितीश दिल्लीत थांबला
- भंडारा येथील प्रितेश धीरज पात्रे हा विद्यार्थी रोमानियाच्या सीमेवरून शुक्रवारी सकाळी विशेष विमानाने दिल्लीत दाखल झाला. मात्र दिल्ली येथून नागपूरपर्यंत येण्यासाठी विमान न मिळाल्याने त्याला दिल्लीतच थांबावे लागले. रात्री उशिरापर्यंत काही व्यवस्था होवून तो शनिवारी सकाळपर्यंत भंडारा येथे पोहचण्याची शक्यता आहे. युक्रेन देशातील व्हिनेस्कीया शहरात तो एमबीबीएस करीत आहे. भंडारा येथे त्याची आई आणि वडील त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

हेलिकॉप्टरच्या घिरट्या अन् बंदुकींचा आवाज 
- युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झाले. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. युद्धामुळे बॉम्बचा कानठाळ्या बसविणारा आवाज, विमान, हेलिकॉप्टरच्या घिरट्या आणि बंदूकीचा आवाज याने आम्ही घाबरून जायचो. पण हिंम्मत हारलो नाही.
- डेनिफर शहर ते रोमानिया सीमेपर्यंत ३५० किलोमीटर अंतर आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय रुपयात १५ हजार रुपये भाडे द्यावे लागे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतरच बस उपलब्ध झाली आणि विद्यार्थी रोमानियाच्या सीमेवर पोहचले.

 

Web Title: When the siren of war sounded, the country was remembered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.