नगर परिषद अभ्यासिका, वाचनालय केव्हा सुरू करणार?
By Admin | Published: June 8, 2017 12:25 AM2017-06-08T00:25:49+5:302017-06-08T00:25:49+5:30
नगरपरिषद क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय यांचे खूप मोठे महत्व आहे.
निवेदन : सुशिक्षित बेरोजगारांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगरपरिषद क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय यांचे खूप मोठे महत्व आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जेव्हा अभ्यासिकेकडे वळतील तेव्हा भारत हे एक महासत्ता होईल. या बाबासाहेब आंबेडकर यांचा उक्तीला पुर्णत्वास नेण्यासाठी नगर परिषद क्षेत्रामध्ये अभ्यासिका व वाचनालय याची आवश्यकता आहे. पालिकेने ते सुरू करावे, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेने मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
शासकीय, निमशासकीय नोकरी मिळविण्यासाठी व बेरोजगारी कमी होवून एक आदर्श जीवन जगण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. मुळात सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्यामुळे बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी अभ्यासिका एक महत्वाचे साधन आहे.
शासनातर्फे मोठ्या प्रमाणात संघ लोक सेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, आयबीपीएस, बँकिंग, रेल्वेभरती, आॅर्डनस फॅक्टरी, सिमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा घेण्यात येत असतात. त्यामुळे या परीक्षा देवून नौकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवश्यकता असते.
पवनी नगर परिषद क्षेत्रात योग्य वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध नसल्यामुळे आजच्या युवक वर्गाला नौकरी मिळवून भवितव्य घडविण्यात खूप मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या समस्यांना तोंड देण्यासाठी व स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी अभ्यासिका व वाचनालयाचा मोठा सहभाग असतो. पवनी नगर परिषद क्षेत्राचा विकास व्हावा आणि याचा आदर्श ठेवून भावी पिढी घडावी म्हणून नगर परिषद पवनीतर्फे अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करून द्यावे.
अशा आशयाचे निवेदन आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना देण्यात आले.
निवेदनाचा विचार करून पवनी शहराचा तसेच जिल्ह्यात पवनी नगर परिषदेचा नाव उंच करून नवीन अभ्यासक पिढी तयार करण्यात हातभार लावत पवनी नगर परिषद क्षेत्रात वाचनालय व पुर्णवेळ अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व सुशिक्षित बेरोजगार युवक निलेश, चंद्रकांत काटेखाये, अश्विन रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.