लाखांदूर तालुक्यात दुष्काळ केव्हा जाहीर होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:31+5:302021-02-15T04:31:31+5:30
सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान ...
सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर तालुक्यातील महत्तम शेतकरी धान उत्पादक आहेत. त्यानुसार यंदाच्या खरीपात तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्रात धान पिकाची, तर उर्वरित क्षेत्रात अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदाच्या खरीपात तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला तब्बल तीनदा पूर आल्याने तालुक्यातील अधिकतम क्षेत्रातील पिक शेतीचे पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तथापि, पूर परिस्थिती ओसरत नाही तोच पुढील काळात उर्वरित क्षेत्रातील लागवडीखालील धान पिकांवर तुडतुडा तर काही पिकांवर अन्य कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक खराब झाले.
यासंबंधित परिस्थितीत लागवडीखालील पिकांची उत्पादकता घसरली असताना परतीच्या पावसानेदेखील कापणीपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकूणच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे व कीड रोगाच्या प्रादुर्भावाने तालुक्यात पीक उत्पादकतेत घट येऊन अंतिम आणेवारीही ५० टक्क्यापेक्षा कमी ०.३७ टक्के असल्याचे तालुका प्रशासनाने जाहीर केले. सदर आणेवारी गतवर्षी ३१ डिसेंबर रोजी जाहीर होताच शासन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर करणार व सदर दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार, असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला गेला. मात्र तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ लोटूनही दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. खरीपातील पीक उत्पादनाच्या भरवशावर पुढील वर्षभर कुटुंब पोषण करणारे शेतकरी कुटुंब यंदा मात्र सुमार आर्थिक संकटात सापडल्याचे वास्तव आहे.
दरम्यान, तालुक्यातील सबंध शेतकरी जनता आर्थिक संकटात सापडली असताना शासनाच्या वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचे सत्र चालविले आहे. पीक कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात उत्पादन न आल्याने कर्ज परतफेड करण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तालुक्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला वैतागून आत्महत्या केली आहे.
या सबंध परिस्थितीची प्रमुख लोकप्रतिनिधीसह जिल्हा प्रशासनाला जाणीव असतानाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, दुष्काळसदृश परिस्थिती असताना शासनाने तालुक्यात मजुरी कामेदेखील उपलब्ध न केल्याने कामाविना अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील जनतेत केली जात आहे.