शेतकऱ्यांची आर्त केव्हा ऐकू येणार !

By admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:41+5:302016-04-03T03:49:41+5:30

जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.

When will the farmers' demands be heard? | शेतकऱ्यांची आर्त केव्हा ऐकू येणार !

शेतकऱ्यांची आर्त केव्हा ऐकू येणार !

Next

जोहार मायबाप जोहार : शासनाकडून बोळवण, कर्जाखाली दबला पोशिंदा
प्रशांत देसाई भंडारा
जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. एकीकडे निसर्गाचा सततचा लहरीपणा दुसरीकडे शासनाने त्यांच्याकडे फिरविलेली पाठ. निसर्ग व शासनाच्या फेऱ्यात सापडलेला शेतकरी आता जगायचे कसे? या विवंचनेत अडकला आहे.
परिणामी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याची गावे दुष्काळग्रस्त यादीत आली नाही. त्यामुळे त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडे हात पसरावे लागत आहे.
शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असताना त्यांचे भवितव्य पूर्णत: निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा चातकासारखी वाट बघत असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने, अवसान व मनोधैर्य खचू लागते. पावसाविना धंदा नाही, पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजिविकेच्या शोधात तरूणवर्ग शहराकडे धाव घेतो. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते.
लोकप्रतिनिधी आणि सरकार या दोघांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. बियाणे, खते मुबलक प्रमाणात असतानादेखील कृत्रिम टंचाई करून वाजवीपेक्षा जास्त दरात विकली जातात. पावसाच्या अभावामुळे शेताला पाणी तरी द्यायचे कुठून? या प्रश्नाने शेतकरी हैराण होतो. पाऊस पडला नाही तर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गाव जाहीर केली असती तर शेतकऱ्यांना काही सवलती मिळू शकतील, एवढीच शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मायबाप सरकारने तेही केले नाही.

कष्ट करूनही दुष्टचक्राचा फेरा कायम
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही आपलेपणाने लक्ष देत नाही. त्यामुळे काबाडकष्ट करूनही हाती काहीच लागत नाही. त्यातून व्यसनाधीनता व आत्महत्या या चक्रात शेतकरी अडकतो. मुलीचे लग्न करताना शहरातील नोकरदाराला ‘मागेल तो हुंडा देऊन करू’, पण गावातील शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, अशीही मानसिकता तयार होते. शेतकरी मागून मागून काय मागतात तर शेतीसाठी पाणी, शेतीसाठी खते, शेतीसाठी कर्ज आणि उत्पादनाला परवडेल असा भाव.
मुक्या जनावरांवरही संकट
पाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होऊन जाते. सर्वाधिक हाल मुक्या जनावरांचे होतात. हिरव्या चाऱ्यावाचून दुभती जनावरे दूध देईनाशी होतात. शेतमालाला हमीभाव नसतो. उत्पादनावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो. शेतीमाल सरासरीपेक्षा जास्त झाला तर भाव कमी होतो. उत्पादन कमी झाले तर स्थिर राहतो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कसा व कुठून काढायचा हा कायमस्वरूपी प्रश्न दुर्लक्षित राहतो. उसनवारी बंद पडल्यामुळे घरातील सोनेनाणे विकायची वेळ येते.
जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला सरसकट माफी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, हे आश्वासन पुर्णत्वास गेले नाही. त्यामुळे आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीच राहण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी पुढाकार घेत पीक लागवड व शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी करून स्वयंरोजगार देण्यासाठी सुनिल फुंडे हे धडपडत आहेत.

Web Title: When will the farmers' demands be heard?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.