डाव्या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:04 PM2018-04-08T22:04:56+5:302018-04-08T22:07:51+5:30

गोसेखुर्द प्रकल्पातून कोंढा परिसरात बारमाही पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा यावर्षी देखील पूर्ण होणार नाही. प्रकल्पाचा डावा कालवा कोंढा परिसरातून जातो.

When will the left canal work be completed? | डाव्या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार?

डाव्या कालव्याचे काम कधी पूर्ण होणार?

Next
ठळक मुद्देबांधकाम धिम्यागतीने : १० कि.मी.च्या पुढील बांधकाम ठप्प, चौरास भागातील शेतकऱ्यांचा सवाल, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा कोसरा : गोसेखुर्द प्रकल्पातून कोंढा परिसरात बारमाही पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा यावर्षी देखील पूर्ण होणार नाही. प्रकल्पाचा डावा कालवा कोंढा परिसरातून जातो. या कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र धरणापासून १० कि.मी. च्या पुढे कालव्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या कालव्यातून बाराही महिने पाणी मिळण्याची आशा धूसर झाली आहे.
इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन १९८४ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री स्व.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्त करण्यात आले. तेव्हापासून २४ वर्षांचा कालावधी झाला. पण हा प्रकल्प पूर्ण होऊन शेतकºयांना बाराही महिने पाणी पुरवठा करू शकला नाही. प्रकल्पाचा उजवा कालवा तेवढा सुरु झाला असून शेतकºयांना पाणी पुरवठा करीत आहे. डावा कालवा हा ३५ कि.मी. लांबीचा असून देखील अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. या कालव्याच्या कामात अनियमितता आढळल्याने कामाची तोडफोड करून ते काम पुन्हा करण्यात येत आहे. या कालव्याच्या कामात सिंचन विभागाचे अनेक अधिकारी, अभियंता निलंबित झाले. तरी देखील या कालव्याच्या कामात वेग आलेला नाही. ० ते १० कि.मी. पर्यंत डाव्या कालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन, कंपनीला आहे. यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. पण डाव्या कालव्याचे काम १० कि.मी. च्या समोर भांगडिया कन्स्ट्रक्शन कंपनीला आहे. त्यांचे काम देखील पाडण्यात आले. त्या कामासाठी जनमंच ही स्वयंसेवी संस्थेनी नागपूर उच्च न्यायालयात कामाच्या अनियमितेबद्दल प्रकरण दाखल करून ते काम पाडून नव्याने अस्तरीकरणाचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र डाव्या कालव्याचे १० कि.मी. नंतरचे काम भांगडिया कन्स्ट्रक्शन कंपनीने पाहिजे त्या वेगाने केले नाही. अजून काम जैसे थे अवस्थेत आहे. या कंपनीचे मालक भाजपा पक्षाचे आमदार आहेत. तसेच वरिष्ठ भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले आमदार म्हणून किर्तीकुमार भांगडिया तसेच आमदार मितेश भांगडिया समजले जातात. त्यांच्या कंपनीला हे काम असल्याने त्यांनी वेगाने कालव्याचे काम केले नसल्याची ओरड आहे.
चौरास भागात डावा कालवा हा एक वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांना बाराही महिने शेतीसाठी पाणी या कालव्यातून मिळणार आहे. पण याचे काम पूर्ण होत नसल्याने चौरास भागातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. चौरास भागातील संपूर्णर् सिंचन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आधी उन्हाळ्यात उन्हाळी धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र विहिरी कोरड्या पडल्याने उन्हाळी धानाची लागवड अत्यल्प केली जात आहे. अशावेळी डावा कालवा कोंढा, आकोट, चिचाळ, सेंद्री, भावड, खैरी, आसगाव, विरली (बु.), लाखांदूर अशा परिसराला वरदान ठरू शकते. परंतू ३५ कि.मी. लांबी असलेल्या कालव्याचे काम केव्हा पूर्ण होईल असे शेतकरी प्रश्न विचारित आहेत. डावा कालव्याचे काम पूर्ण झाल्यावर त्यास उपकालवे देवून शेतकºयांना पाणी देण्यात येणार आहे. सध्या चौरास भागातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. भांगडिया कन्स्ट्रक्शन कंपनीने आपले काम युद्धपातळीवर सुरु केले असते तर यावर्षी पावसापूर्वी हे काम पूर्ण झाले असते. पण तशी चिन्हे दिसत नाही. पावसाळा लागण्यास दोन महिने शिल्लक आहेत. पुढच्या वर्षी देखील कालव्याचे काम पूर्ण होईल याची शक्यता नाही. मोठी आसामी असलेल्या कंपनीवर नियंत्रण आणून ते काम करवून घेणे हे वरिष्ठ अधिकारी वर्गाचे आहे. ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कळते. तेव्हा दरवर्षी पावसाळ्यात आपले धानपिक वाचविण्यासाठी धडपडणारा चौरासचा शेतकरी केव्हा समृद्ध होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. चौरास भागाला न्याय मिळवून देणारे लोकप्रतिनिधी मिळाले नाही. डावा कालव्याचे कामाचे भूमिपूजन होऊन ३४ वर्षानंतर देखील पूर्ण झाले नाही. कालव्याच्या बाजूला ड्रेन तयार केल्या आहेत. तिथे कच्चे पुल धरण विभागाने केले. पण पक्के पुल न केल्याने पावसाळ्याचे पाणी शेतातून निघत नाही. ही देखील समस्या सुटली नाही. कालवा पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाराही महिने शेतीसाठी पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना सर्व समस्यावर समाधान मिळेल. धरण विभाग या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी केव्हा लक्ष देईल, असा प्रश्न चौरासचे शेतकरी विचारत आहेत.

Web Title: When will the left canal work be completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.