तुमसर देव्हाडी मार्गावर पथदिवे केंव्हा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:33 AM2021-03-24T04:33:07+5:302021-03-24T04:33:07+5:30
तुमसर : तुमसर ते देव्हाडी हा पाच किलोमीटरचा दुपदरीकरण रस्ता तयार करण्यात आला. रस्त्याच्या मधोमध दुभाजकात सौर ऊर्जेचे दिवे ...
तुमसर : तुमसर ते देव्हाडी हा पाच किलोमीटरचा दुपदरीकरण रस्ता तयार करण्यात आला. रस्त्याच्या मधोमध दुभाजकात सौर ऊर्जेचे दिवे अर्ध्या रस्त्यापर्यंत लावण्यात आले होते. परंतु दिवे लावलेले खांब काही ठिकाणी वाकले होते. जमिनीत रितसर गाडले न गेल्याने काही खांब वाकले होते. संबंधित कंत्राटदाराने सर्व पथदिव्यांचे खांब काढले; परंतु अजूनपर्यंत या रस्त्यावर पथदिव्यांचे खांब पुन्हा गाडले नाही. अंधार असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसर देव्हाडी हा पाच कि. मी.चा रस्ता सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वर्दळीचा आहे. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी दुपदरीकरण रस्ता बांधकाम करण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्या दुभाजकात सौर दिवे असलेले थांब लावण्यात आले अर्ध्या रस्त्यापर्यंत सौर दिवे सुरूही करण्यात आले होते. परंतु महिनाभरातच हे संपूर्ण सौरदिव्यांचे खांब काढण्यात आले. सौर दिव्यांचे खांब हे जमिनीत योग्यरित्या गाडण्यात आले नव्हते. त्यामुळे काही खांब वाकले होते.
वादळी वाऱ्यात हे खांब भुईसपाट होण्याच्या धोका निर्माण झाला होता. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती.
सौर दिव्यांचे खांब काढल्यानंतर येथे नव्याने सौर दिव्यांचे खांब लावण्यात आले नाहीत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर रात्री अंधाराचे साम्राज्य असते. वर्दळीचा रस्ता असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित बांधकाम खात्याने येथे सौर दिवे सुरू करून रस्ता प्रकाशमान करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.