कोविड सेंटरसाठी काम करणाऱ्या यंत्रणेला पैसे केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:48+5:302021-07-31T04:35:48+5:30
कोंढा (कोसरा) : भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन व इतर यंत्रणांनी काटेकोरपणे दुसऱ्या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी कोविड केअर सेंटर ...
कोंढा (कोसरा) : भंडारा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन व इतर यंत्रणांनी काटेकोरपणे दुसऱ्या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले. त्याठिकाणी सेवा पुरविण्यासाठी विविध यंत्रणांना शासकीय नियमानुसार कामे देण्यात आली होती. आता दुसरी लाट आटोक्यात येऊन तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी पूर्वतयारी सुरू आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत कोविड सेंटरला सेवा पुरविणाऱ्यांना अजूनही निर्धारित रक्कम मिळाली नाही. तो निधी केव्हा येणार, याविषयी तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली.
पवनी तालुक्यातील सिंदपुरी (रुयाळ) येथे मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर व हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली होती. त्यावेळी कोरोनाच्या रुग्णांमध्ये राहून आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. यात कक्षसेवक, सफाई कामगार, जेवणाची व्यवस्था पुरविणारे, पाणी, इलेक्ट्रिशिअन, शववाहिनी चालक यांचा समावेश होता. ही सर्व यंत्रणा या परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा व कोविड सेंटरच्या व्यवस्थेत गुंतली होती. त्यासाठी तहसील कार्यालयामार्फत संबंधिताना कामे व सेवा पुरविण्याचे आदेश देण्यात आले. त्यांना मेहनतनामा देण्याचे मान्य केले होते. आता जून महिन्यापासून कोविड केअर सेंटरला रुग्ण नसल्याने काही सेवाबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. एक महिन्याचा काळ लोटला असूनही मात्र कोविडचा निधी तालुक्याला मिळाआ नाही. त्यामुळे या सेवा देणाऱ्या सर्व सेवादात्यांना केव्हा मोबदला मिळेल याची प्रतीक्षा आहे, तर कोविडच्या या दुसऱ्या लाटेत जिल्हा आरोग्य यंत्रणेने वारंवार जाहिरात काढून आवश्यक असलेला स्टाफ मिळत नसल्याने तालुकास्तरावर वरिष्ठांच्या सूचनेनुसार काही आरोग्य परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून सतत तीन महिने रुग्णांची सेवा केली. त्यांच्या नियुक्तीसंदर्भात तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षकांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना लेखी व सर्व कागदपत्रे देऊनसुद्धा त्यांना मानधन मिळाले नसल्याचे समजते. संबंधित विभागाने नियम व अटी न घालता ज्यावेळी सेवा देणारे कोणीही नव्हते अशावेळी सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कामाचा मोबदला देण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोट
कोविडचा निधी अजून विभागाला मिळाला नाही. निधीची मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच सेवा पुरविणारी यंत्रणा व रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला अदा करण्यात येईल.
-नीलिमा रंगारी, तहसीलदार, पवनी