रोहयोअंतर्गत मजुरांना मेहनतीचे ३ कोटी ८१ लाख रुपये केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 02:08 PM2024-07-06T14:08:58+5:302024-07-06T14:09:57+5:30

Bhandara : १५ हजार मजुरांचा समावेश रोजगार हमी योजना

When will you pay 3 crore 81 lakh rupees for hard work to the laborers under Rohyo? | रोहयोअंतर्गत मजुरांना मेहनतीचे ३ कोटी ८१ लाख रुपये केव्हा?

When will you pay 3 crore 81 lakh rupees for hard work to the laborers under Rohyo?

मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क 
तुमसर :
गावातील मजुरांना गावातच किमान तीन महिने कामे उपलब्ध व्हावीत याकरिता केंद्र व राज्य शासन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत गावातच कामे उपलब्ध करून देते. त्या अकुशल मजुरांना मात्र निधीअभावी मजुरी मिळत नाही. तुमसर तालुक्यात रोहयोअंतर्गत सुमारे दोन महिने १५ हजार अकुशल मजुरांनी अकुशल कामे तालुक्यातील विविध गावांत केली. त्या मजुरांना ३० मेपर्यंतची मजुरी अजूनपर्यंत मिळालेली नाही. ही रक्कम ३ कोटी ८१ लाख २१ हजार २०४ रुपये इतकी आहे. तुमसर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती असून बहुसंख्य ग्रामपंचायतींनी गावातील मजुरांना एमआरजीएसअंतर्गत अकुशल कामे उपलब्ध करून दिली. शासनाने येथे मागील दोन महिन्यांपासून अकुशल कामगारांना त्यांची मजुरी अजूनपर्यंत दिली नाही.


निधी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात येते. हातावर आणून पानावर खाणे असा या मजुरांचा दिनक्रम असतो. त्यालाही निधी मिळत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. एवढे दिवस हे मजूर विनामजुरीने कशी कामे करतील, हे एक न उलगडणारे कोडे आहे.


३० मेपर्यंत या अकुशल मजुरांना शासनाकडून मजुरी देण्यात आली नाही. ग्रामपंचायतीमध्ये हे मजूर मजुरी केव्हा मिळेल याची विचारणा करीत आहेत. पंचायत समिती पदाधिकाऱ्यांकडेही मजुरीबाबत दररोज विचारणा केली जाते. शासनाकडून निधी मिळाला नसल्याने मजुरी खात्यावर जमा झाली नाही, हे एकच उत्तर त्यांना दिले जाते.


कुशल कामांचाही निधी थकीत
कुशल कामेही तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यात ८४ लाख ९४ हजार ८७२ रुपये थकीत आहेत. यात लाभार्थ्यांची संख्याही मोठी आहे. आता पावसाळा सुरू झाला तरीसुद्धा अकुशल व कुशल कामांचे थकीत बिल शासनाने तत्काळ देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या सोडवण्याची गरज आहे.


"तुमसर तालुक्यात अकुशल मजुरांची ३ कोटी ८१, तर कुशल कामांचे ८४ लाख ९४ हजार रुपये थकीत आहेत. येत्या आठ दिवसांत अकुशल मजुरांना त्यांची मजुरी त्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल."
- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर.
 

Web Title: When will you pay 3 crore 81 lakh rupees for hard work to the laborers under Rohyo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.