विदर्भाच्या काशीत विकास कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:48 AM2019-04-28T00:48:24+5:302019-04-28T00:50:14+5:30
वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा यांनीही पवनीचे गतवैभव परत मिळविण्याचे कधी प्रयत्न न केल्याने या शहरात अजूनही विकास शोधावा लागतो.
भंडारा जिल्हा गॅझेटियरमध्ये पवनीचा उल्लेख 'पद्मावती नगर' असा आहे. पवनी शहरात हलबा समाजाची संख्या मोठी होती. त्यांनी विणलेली मलबारी साडीला विदेशात मागणी होती. विणकर समाज साडी विणायचा. कोसरे समाज त्यांना मदत करायचा तर मुस्लीम समाज त्यांच्या साडीची मार्केटिंग करायचा. १८६५ मध्ये नागपूर येथील प्रदर्शनीत या विणकरांनी प्रथम व द्वितीय पारितोषिके पटकावली होती. त्याकाळी येथील विणकरांचे वार्षिक उत्पन्न ४० हजार रुपयांपर्यत होते, असे ब्रिटीश गव्हर्नर लॉरेन्स यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे. या शहरात बारई समाजाचे पानमळे होते.
मासेमारी, कृषी व अन्य लहानमोठ्या व्यवसायातून हे शहर बऱ्यापैकी धनसंपन्न झाले होते. या शहरात शेकडो मंदिरे असल्याने ब्राम्हण समाजाची अनेक कुटुंबे होती. शहराचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मुळात तेच होत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील उद्योग पुनर्जिवित करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.