निवडणूक होणार की नाही, संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 05:00 AM2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:40+5:30
जिल्हा परिषदेच्या ३९ गटांसाठी निवडणूक होऊ घातली असून, मंगळवारी झालेल्या छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यात साकोली तालुक्यातील कुंभली आणि वडद येथील प्रत्येकी एक, भंडारा तालुक्यातील खोकरला दोन, पवनी तालुक्यातील चिचाळ गटातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आता ३९ गटांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष, तर १६३ महिलांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी निवडणूक होत असून, ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ओबीसी जागा वगळून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वघोषित कार्यक्रमानुसार घेण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, राजकीय नेत्यांनी आरक्षण नाही तर निवडणुका नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही, असा संभ्रम या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वांचे लक्ष आता शासनाच्या आदेशाकडे लागले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबर रोजी नागरिकांचा मागास प्रवर्गातील निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली.
विशेष म्हणजे या गण व गटातील नामांकनाची छाननीही करण्यात आली नाही. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षण नाही तर निवडणूक नाही, अशी भूमिका घेतली. ओबीसी क्रांती मोर्चाने तर निवडणुका झाल्या तर ओबीसी समाज बांधवांनी या निवडणुकीत मतदान करू नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सर्वच निवडणुकीला स्थगिती मिळणार काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक उमेदवारांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मंगळवारी अर्जांची छाननी झाली. आता १३ डिसेंबरला उमेदवारी मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे; परंतु ऐनवेळी निवडणुकीला स्थगिती मिळाली तर आपला पैसा पाण्यात तर जाणार नाही ना, अशी भीतीही उमेदवारांना लागली आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांना मात्र ही निवडणूक व्हावी, असे मनोमन वाटत आहे. परंतु त्याच पक्षाचे नेते मात्र निवडणूक स्थगित करण्याची भाषा करत आहे.
जि. प. मध्ये सहा, तर पं. स. मध्ये ११ नामांकन रद्द
- जिल्हा परिषदेच्या ३९ गटांसाठी निवडणूक होऊ घातली असून, मंगळवारी झालेल्या छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. त्यात साकोली तालुक्यातील कुंभली आणि वडद येथील प्रत्येकी एक, भंडारा तालुक्यातील खोकरला दोन, पवनी तालुक्यातील चिचाळ गटातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आता ३९ गटांसाठी ३६१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १९८ पुरुष, तर १६३ महिलांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी निवडणूक होत असून, ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. त्यात तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी, साकोली तालुक्यातील बोदरा, लाखनी तालुक्यातील कनेरी, भंडारा तालुक्यातील बेला, ठाणा, सावरी येथून प्रत्येकी एक, तर पवनी तालुक्यातील अड्याळ गणातून तीन तर आकोट व मांगली गणातून प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आता ७९ जागांसाठी ५४४ उमेदवार रिंगणात असून, त्यात ३२० पुरुष आणि २२४ महिलांचा समावेश आहे.
१३ गटांमध्ये १०७ उमेदवारांचे नामांकन
- जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या या १३ गटांमधून १०७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. त्यात तुमसर तालुक्यातून २२, मोहाडी १८, लाखनी ३९, भंडारा १२, पवनी तालुक्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक लाखनी तालुक्यातील ३९ उमेदवारांचा समावेश असून या तालुक्यातील चार गटांची निवडणूक स्थगित झाली आहे.
२५ गणातील १५७ उमेदवारांचा जीव टांगणीला
- पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १५७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यात तुमसर तालुक्यात २९, मोहाडी २१, साकोली १९, लाखनी १४, भंडारा ३७, पवनी २१, लाखांदूर १६ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांनी नामांकन दाखल केले. परंतु छाननीनंतर प्रक्रिया थांबली आहे. आता निवडणूक कधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.