साहेब तुम्हीच सांगा, शेती रासायनिक करू की सेंद्रिय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:12 PM2024-05-13T15:12:06+5:302024-05-13T15:12:44+5:30
खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर : शेती व्यवसाय तोट्याचाच
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : व्यवसायातून कोणतेही उत्पादन घेण्यासाठी रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर करणे महागडे ठरत आहे. परिणामी शेती व्यवसायात तोटाच सहन करावा लागतो. रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत आणि सेंद्रिय खत वापरले तर त्याचा एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या तुलनेत शेतमालाच्या आधारभूत किमती मात्र फारच कमी आहे. त्यामुळे या व्यवसायात तोटा सहन करावा लागतो. रासायनिक खतांचा व तणनाशक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जमिनीचा स्तर घसरला आहे. तसेच यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही, पाण्याचा निचराही होत नसल्याने उत्पादनात घट येत आहे. शेती पुरेपूर रासायनिक खतांच्या वापराची झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय खते त्वरित कार्य करणे शक्य नाही, यासाठी भरपूर अवधी लागेल, यासाठी काही प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल.
सेंद्रिय खतांचाही तुटवडा
■ जिल्ह्यातील बरेच शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर करून शेती व्यवसाय करण्यावर भर देत आहेत, पण सेंद्रिय खत स्वतः अंगमेहनत करून तयार करावे लागते, पण असे मात्र खूप कमी शेतकरी करतात, यामुळे सेंद्रिय खतांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीच कामाची ठरते.
सेंद्रिय शेतीतून भागणार कसे?
■ आता शेती पूर्णतः रासायनिक खतांनी माखली आहे. या खतांच्या वापरामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे; पण आता सेंद्रिय खतांचा वापर केल्यास तुलनेत उत्पादनात कमालीची घट येईल, आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्पादन फार कमी होईल.
सेंद्रिय खते तरी स्वस्त कुठे?
■ रासायनिक खते कृषी केंद्रातून सहज उपलब्ध होतात; पण सेंद्रिय खत मात्र तयार करावे लागतात, जर सेंद्रिय खत विकत घ्यायचे असल्यास यासाठी अधिक रक्कम मोजावी लागते, सध्या महिला बचत गटांकडून सेंद्रिय खत तयार केले जाते.