भंडारा जिल्ह्यात विहिरीचे बांधकाम करीत असताना एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:34 PM2018-05-15T12:34:21+5:302018-05-15T12:34:21+5:30
लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे विहीरीचे बांधकाम करीत असतांना मातीचा ढेला कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१५) सकाळी ७ वाजता दरम्यान जगदीश बावणकर यांच्या शेतात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे विहीरीचे बांधकाम करीत असतांना मातीचा ढेला कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१५) सकाळी ७ वाजता दरम्यान जगदीश बावणकर यांच्या शेतात घडली. आनंदराव ढोरे (६१) मु.करांडला असे मृतकाचे नाव असून, शंकर शहारे (५२), गोपाल उपारे (५४) हे गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालय लाखांदूर येथे उपचार सुरू आहे.
सदर घटना अशी की, भंडारा जिल्ह्यातील चौरास भागात पाण्याची पातळी खोल असल्याने वरून खाली विहीरीचे बांधकाम केल्यानंतर विहीरीला पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान होत असते. त्यामुळे या भागातील शेतकरी सुरवातीला जेसीबीच्या साहाय्याने पंधरा ते वीस फुटाचा खड्डा तयार करून, फिल्टर मारून पाणी लागल्यानंतर सिमेंन्टने विहिरीचे बांधकाम करतात.
नांदेड येथे देखील याच पद्धतीचा अवलंब करून विहीरीचे बांधकाम सुरू होते. या कामावर करांडला येथील रहिवासी आनंदराव ढोरे, आसाराम राऊत, जागेश्वर ठाकरे, सुधाकर तोंडरे, शंकर शहारे, गोपाल उपारे हे कामावर होते. त्यात शंकर शहारे, गोपाल उपारे, आनंदराव ढोरे हे विहिरीच्या खड्ड्यांत उतरून उपसा करतांना वरून मातीचा ढेला पडल्याने आनंदराव ढोरे यांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर शंकर शहारे, गोपाल उपारे हे गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना घडून आल्यानंतर कामावर असलेल्या मजूरांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर मृतक व जखमींना वर काढून जखमींना ग्रामीण रूग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले आहे.