लाच घेताना पोलीस शिपाई जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:20 AM2018-02-09T00:20:58+5:302018-02-09T00:21:12+5:30
किरकोळ देशी दारू विक्री करणाऱ्याकडून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन एका पोलीस नायकाने १३ हजार रूपयांची लाच मागितली. यात ११ हजार रूपयांची लाच घेताना अशोक ओमाजी मांदाळे (३८) याला रंगेहाथ पकडण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : किरकोळ देशी दारू विक्री करणाऱ्याकडून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन एका पोलीस नायकाने १३ हजार रूपयांची लाच मागितली. यात ११ हजार रूपयांची लाच घेताना अशोक ओमाजी मांदाळे (३८) याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाखांदूर पोलीस ठाण्यात केली.
तक्रारदार हे वडिलोपार्जीत शेती करीत असून त्यांचा किरकोळ देशी दारू विक्रीचाही व्यवसाय आहे. चालक पोलीस नायक अशोक मांदाळे याने सदर किरकोळ देशी दारू विक्री करण्याकरिता प्रति महिना ९ हजार रूपयांची मागणी केली होती.
तसेच तक्रारदाराकडून दर महिन्याला जबरदस्तीने ९ हजार रूपये घेवून जात होते.
मागील महिन्यात मांदाळे याला सदर रक्कम देण्याकरिता तितका निधी उपलब्ध न झाल्याने त्यापैकी पाच हजार रूपये दिले होते. त्यामुळे मांदाळे याने तक्रारदाराला वारंवार खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन मागील महिन्याचे व चालू महिन्याचे असे एकूण १३ हजार रूपयांची लाच मागितली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची तक्रार भंडारा एसीबीकडे नोंदविली. तडजोडीअंती १३ हजार रूपयांपैकी ११ हजार रूपयांची लाच स्विकारताना मांदाळे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, गणेश पदवाड, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, निलेश मेश्राम यांनी केली.