चालता-बोलता अवलिया करतोय व्यसनमुक्तीचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:53 AM2021-02-23T04:53:07+5:302021-02-23T04:53:07+5:30
भंडारा : कुठलाही मनुष्य जन्मतः व्यसनी नसतो. परिस्थिती, काळ व संगत मनुष्याला व्यसनाकडे घेऊन जाते. त्या व्यसनातून परावृत्त होण्यासाठी ...
भंडारा : कुठलाही मनुष्य जन्मतः व्यसनी नसतो. परिस्थिती, काळ व संगत मनुष्याला व्यसनाकडे घेऊन जाते. त्या व्यसनातून परावृत्त होण्यासाठी दांडगी इच्छाशक्ती असल्यास सहजपणे त्यावर मात करता येते. असाच एक अवलिया चालता-बोलता व्यसनमुक्तीचे कार्य इमानेइतबारे पार पाडत आहे. डमदेव कहालकर असे या अवलियाचे नाव असून शिक्षणक्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी येथील रहिवासी असलेले डमदेव कहालकर हे मिरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. गत दोन दशकांपासून व्यसनमुक्तीचे कार्यही ते अहोरात्रपणे करीत आहेत. शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा वसा हाती घेतला आहे. यासाठी कहालकर यांना त्यांच्या सौभाग्यवतीचे सहकार्य लाभले आहे. अनेक संस्था, परिषद व राज्य शासनाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यात राज्य व्यसनमुक्ती पुरस्काराचाही समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कारासह कलारत्न पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. अनेक तरुणांसह व्यसनाधीन असलेल्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे त्यांनी कार्य केले आहे. समाज व्यसनमुक्त करण्याचा संकल्पही डमदेव कहालकर यांनी सोडला आहे. या प्रेरणेने भारावलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते आता परिचित झाले आहेत. जिल्ह्यात कुठेही व्यसनमुक्तीचे कार्य सुरू असल्यास त्यात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो.
भंडारा येथील महाबोधी संस्थेतर्फे आयोजित व्यसनमुक्ती कार्यशाळेला त्यांची आवर्जून उपस्थिती असते. याचबरोबर चालता-बोलता अनेक इसमांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे कार्यही त्यांनी हाती घेतले आहे. नुकतेच शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसरात भ्रमण करीत असताना त्यांना काही तरुण अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. यात त्यांनी त्याचवेळी या तरुणांना प्रबोधन करीत व्यसन शरीराला कसे घातक आहे, ते पटवून दिले. या तरुणांनीही पुन्हा आयुष्यात व्यसन करणार नाही, असा संकल्प सोडला.
बॉक्स
इतरांसाठी प्रेरणादायी
शिक्षणक्षेत्रात कार्य करणारे कहालकर यांनी व्यसनमुक्तीसह विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. याची अनेक संस्थांनी दखल घेत त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव केला. शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबवित असतानाच व्यसनमुक्तीच्या कार्याने भारावून गेलेल्या या अवलियाचा आता व्यसनमुक्तीचे कार्य पाहून अनेकांनी प्रेरणा घ्यावी, असाच संदेश मिळत आहे