अवैध वाहतुकीवर ‘वचक’ कुणाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:05 PM2018-05-13T22:05:12+5:302018-05-13T22:05:12+5:30
१४ लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत. यावर वाहतूक शाखा नियंत्रण केव्हा वचक बसविणार? असा सवाल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १४ लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत. यावर वाहतूक शाखा नियंत्रण केव्हा वचक बसविणार? असा सवाल आहे.
भंडारा जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. अशात लोकसंख्येच्या दृष्टीकोणातून प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यात एस.टी. च्या बसफेरीचा अभावामुळे अवैध वाहतूक फोफावली आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे व नियमबाह्य वाहन चालवित आहेत अशांविरुद्ध आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र परवाना नसलेले वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करीत आहेत. अशावेळी अपघातांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे.
विशेषत: जिल्ह्यातून गेलेल्या पाचही राज्य मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ वाढले आहे. तीन सीटर असो की दहा सीटर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. नियमांना बगल देऊन ही कारवाई खुलेआम सुरु आहे. जिल्हा मुख्यालयात वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे सर्वच ठिकाणी सर्वच मार्गावर नियंत्रण ठेवणे आवाक्याबाहेर आहे. तरीही वर्षभरात वाहतूक शाखेमार्फत जनजागृती करून अपघातांवर आळा कसा बसेल यावर नियंत्रण केंद्रीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अपघातप्रवण स्थळी मार्गदर्शक सूचना, फलक व आवश्यक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टरची गरज आहे. काही ठिकाणी या सुविधा लावण्यातही आल्या आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या राज्य मार्गावरील वळणांवर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मात्र नियमात वाहनचालविणाऱ्यांनाही विनाकारण गोवण्यात येत असल्याच्याही तक्रारीत वाढ झाली आहे.
सध्या लग्नसराईची धुम आहे. अशावेळी ट्रॅक्टर, ट्रक किंवा आॅटोमध्ये वºहाड्यांची ने आण केली जाते. वळणांवर वाहन चालकांचे नियंत्रण गेल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. अशावेळी सावधगिरी बाळगणे महत्वाचे असतानाही व वेळोवेळी अपघातांच्या संख्येत वाढ होऊनही लोकांना त्यातून समज मिळालेली दिसत नाही. याकडे पोलीस विभागाने लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज आहे.