उमेदवार कोण? एकच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:44 PM2019-03-15T21:44:23+5:302019-03-15T21:44:49+5:30
लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विविध मतदार संघात उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केली नाही. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण या एकाच विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर दररोज नवनवीन नावांचा शोध लावला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विविध मतदार संघात उमेदवारांच्या नावांची घोषणा होत आहे. मात्र भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा अद्यापही केली नाही. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण या एकाच विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर दररोज नवनवीन नावांचा शोध लावला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला, तर युतीत भाजपाकडे आहे. उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख २५ मार्च आहे. मात्र त्यानंतर प्रचाराला अवघे १२ दिवस मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आधी उमेदवारी घोषित करून प्रचाराला जास्तीत जास्त वेळ मिळावा, अशी व्यवस्था करीत आहे. मात्र भंडारा-गोंदिया मतदार संघ त्याला अपवाद ठरत आहे. भाजप, राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षासह कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही.
दोनही पक्षात अनेकजण इच्छूक आहेत. प्रत्येकांनी आपल्या पद्धतीने तिकीट मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही जण दिल्लीत तर काही जण मुंबईत तळ ठोकून आहेत. कुणीही ठामपणे आपल्याला उमेदवारी मिळेल हे सांगत नाही. परिणामी उमेदवार कोण याचीच चर्चा सर्वत्र दिसत आहे.
सोशल मिडिया यात अग्रेसर आहे. व्हॉटसअॅप आणि फेसबुकवर पोस्टचा महापूर आला आहे. प्रत्येकजण गणित लावून संबंधितालाच कशी उमेदवारी मिळणार हे सांगत आहे. दोन दिवसांपासून तर काही उमेदवारांची नावे व्हॉटअॅपवरून उमेदवारी निश्चित झाली म्हणून फिरत आहे. मात्र त्यात कोणताही अधिकृतपणा दिसत नाही. गावागावातील चर्चातही राजकारण हाच विषय असून कोणाला उमेदवारी मिळणार हे चविष्टपणे चर्र्चिले जात आहे.
कोणता उमेदवार कसा प्रभावी राहील हे सांगत आहे. जातीचे गणित मांडून यालाच तिकीट मिळेल, असेही अनेकजण सांगत आहे. मात्र जोपर्यंत पक्ष अधिकृत उमेदवारांची घोषणा करत नाही तोपर्यंत अशा चर्चा मतदारसंघात व्हायरलच होणारच.
उमेदवारीसाठी जातीय समीकरण
भंडारा-गोंदिया मतदार संघात उमेदवारीसाठी जातीय समीकरणावर चर्चा होत आहे. या मतदार संघात कुणबी, पोवार, तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या समाजातून उमेदवारी कोणता पक्ष देणार यावरही सोशल मीडियात चर्चा होत आहे.
नागपूरच्या निवडणुकीवर भंडाऱ्यात घमासान
भंडारा जिल्ह्याचे असलेले काँग्रेसचे नेते नाना पटोले नागपूरमधून भाजपचे हेवीवेट उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे आहेत. नागपूर मतदार संघातील निवडणुकीची घमासान चर्चा भंडारा जिल्ह्यात होत आहे. नागपूरातून कोण विजयी होणार यावर आतापासूनच दावे-प्रतिदावे केले जात आहे. सोशल मिडिया तर यात आघाडीवर आहे.