ओबीसी समाजाची वकीली करण्याचा अधिकार वडेट्टीवारांना कुणी दिला? परिणय फुकेंचा संताप

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: September 9, 2023 06:05 PM2023-09-09T18:05:43+5:302023-09-09T18:11:09+5:30

वडेट्टीवारांच्या जालन्यातील वक्तव्यावर परिणय फुकेंची संतप्त प्रतिक्रिया

Who gave Vijay Vadettivar the right to advocate for the OBC community? The fury of Parinay Phuke | ओबीसी समाजाची वकीली करण्याचा अधिकार वडेट्टीवारांना कुणी दिला? परिणय फुकेंचा संताप

ओबीसी समाजाची वकीली करण्याचा अधिकार वडेट्टीवारांना कुणी दिला? परिणय फुकेंचा संताप

googlenewsNext

भंडारा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचे समर्थन करताना, मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ठ करा किंवा सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीचे समर्थन केले होते. यावर आक्षेप घेत, वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकीली करण्याचा अधिकार कुणी दिला, अशा शब्दात माजी राज्यमंत्री तथा ओबीसी नेते डॉ. परिणय फुके यांनी आपला संताप भंडाऱ्यात व्यक्त केला.

येथील विश्रामगृहावर दुपारी झालेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत डाॅ. फुके यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, स्वत:च्या चुका लपविण्यासाठी वडेट्टीवार आता सहानुभूती दाखवायला निघाले आहेत. वडेट्टीवार आणि पटोले हो दोघेही समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फुके यांनी दिला.

वडेट्टीवार महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्री होते, तेव्हा त्यांनी ओबीसी समाजासाठी एकही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे वडेट्टीवार खरोखर ओबीसी आहेत का, हे तपासावे लागेल, असेही ते म्हणाले.
मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्याचाही समाचार फुके यांनी घेतला. वडेट्टीवार आणि नाना पटोले यांचे आपसात पटत नाही. त्यामुळे मीडियावर कोण जास्त वेळ येणार, याची स्पर्धा त्यांच्यात लागली आहे, असा टोला त्यांनी हाणला.

ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना वाटा नको, आम्ही विरोध करणार

ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रकार आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सर्व ओबीसी संघटनांची नागपुरात बैठक झाली असून याचा एकजुटीने विरोध करण्याचे ठरले आहे. नागपुरात उद्यापासून (रविवार) आंदोलन सुरू केले जाणार आहे. ओबीसींचे आरक्षण कायम राखण्यासाठी आम्ही मैदानात उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Who gave Vijay Vadettivar the right to advocate for the OBC community? The fury of Parinay Phuke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.