आपला आमदार कोण? आज करा फैसला ! तिन्ही मतदारसंघात काट्याची टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 11:23 AM2024-11-20T11:23:45+5:302024-11-20T11:24:22+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा मतदारसंघावर सर्वांचीच नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात २० मोव्हवरला मतदान होणार आहे. मतदार राजा या तीनही मतदारसंघात कोण आमदार होणार याचा फैसला करणार आहेत. यासाठी पोलिंग पार्ष्या मंगळवारी आपापल्या मतदान केंद्रस्थळी पोहचले आहेत. मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रारंभ होणार आहे.
जिल्ह्यात तुमसर, भंडारा व साकोली मतदार संघ मिळून एकूण १० लाख १६ हजार ८७० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा पूर्ण तयारीनिशी आहे. मंगळवारला तीनही विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयातून संबंधित मतदान केंद्रांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात आले. यासाठी तीनही मतदार संघात १३४ एसटी बसेससह खासगी वाहनांचा वापर करण्यात आला आहे.
तीनही मतदार संघाच्या मुख्यालयी मंगळवार सकाळी ८ वाजतापासूनच मतदान साहित्य घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोहचले होते. टप्प्याटप्प्याने या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य देण्यात आले. पोलिस कर्मचारीही आपल्या कर्तव्यस्थळी रुजू झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रशासनाच्या नजरेत कमकुवत केंद्रांवरही उत्तम व्यवस्था व्हावी याची काळजी घेण्यात आली आहे. तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रांवर काय असतील सुविधा?
जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात १ हजार १६७ मतदान केंद्र आहेत. या सर्वच केंद्रांमध्ये आरोग्य सुविधांसह पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रसाधनगृहाची सोय करण्यात आली आहे. विद्युत व्यवस्था आहे की नाही याची काळजी घेतली आहे. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पसह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना यादीत नावे दिसावी यासाठी कर्मचारीही मदत करणार आहेत. वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.