राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:40 PM2018-05-07T22:40:41+5:302018-05-07T22:41:11+5:30
नामांकन दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असतानाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नामांकन दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असतानाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. असे असले तरी राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हेसुद्धा संभाव्य उमेदवार असू शकतात.
येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनेही अद्यापपर्यंत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आपण उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रवादीला वाटत आहे तर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर आपण उमेदवार जाहीर करू, असे भाजपला वाटत आहे. अशातच दोन्ही पक्षाकडून उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसून ज्यांचा उमेदवार पहिले घोषित होईल? त्यावरून दुसरा पक्ष उमेदवारीची घोषणा करणार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
सध्या स्थितीत कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देईल? हे पक्षश्रेष्ठींनी ठरविले असले तरी घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. ज्याच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा करावयाची आहे, त्याचे समाजात किती प्राबल्य आहे? याची चाचपणी भाजप व राष्ट्रवादीकडून होत आहे.
राष्ट्रवादी १० मे रोजी दाखल करणार नामांकन
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन्ही पक्षातील पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर १० मे रोजी राष्ट्रवादीचा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता जलाराम मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे.
दि.१० मे रोजी भाजप उमेदवारही नामांकन दाखल करणार असल्यामुळे गुरूवारला दोन्ही पक्षाचे शक्तीप्रदर्शन दिसून येणार आहे.
भाजप ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत
राष्ट्रवादी कोणत्या समाजातील कार्यकर्त्याला निवडणूक रिंगणात आणते? याकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सद्यस्थितीत भाजपकडे माजी आमदार हेमंत पटले, माजी खासदार शिशुपाल पटले, खुशाल बोपचे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार घोषित न केल्यामुळे भाजपने आपले पत्ते उघडलेले नाही. तरीसुद्वा नामांकनासाठी करावी लागणारी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
युतीचा अद्याप निर्णय नाही
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा करून दोन दिवस झाले असतानाही भाजप व शिवसेनेची युती अद्याप झालेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील की एकत्र हेसुद्धा अद्याप निश्चित झाले नाही. युती झाली नाही तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.