मोबाइल मनोरा बांधकामाला अभय कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:19+5:302021-08-18T04:42:19+5:30
पालिका मुख्याधिकारी मूग गिळून : नागरिकांच्या जिवाला धोका कायम भंडारा : साकोली येथील प्रभाग क्रमांक सातमधील तलाव वॉर्डातील पुंडलिक ...
पालिका मुख्याधिकारी मूग गिळून : नागरिकांच्या जिवाला धोका कायम
भंडारा : साकोली येथील प्रभाग क्रमांक सातमधील तलाव वॉर्डातील पुंडलिक कवाशे यांच्या घरपरिसरात निर्माणाधीन मोबाइल मनोऱ्याच्या बांधकामाला अभय कुणाचे? अशी चर्चा रंगली आहे. या बांधकामासाठी पालिकेत कुठलाही ठराव न घेता परवानगी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्रही निर्गमित करण्यात आले होते. वॉर्डवासीयांचा विरोध असतानाही मनोरा बांधकाम करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या सर्व प्रकारात यंत्रणाच भ्रष्टाचारात लिप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी सौरव कावळे मूग गिळून असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मनोरा बांधकामाला नागरिकांचा विरोध नाही, असे पत्र बांधकाम करणाऱ्या संबंधितांनी नगरपरिषद साकोली प्रशासनाला दिले होते. त्यावरूनच प्रकरणात अधिकच संशय निर्माण झाला आहे. ‘आमची स्वाक्षरी मोबाइल मनोरा निर्माण किंवा उभारू नये’, यासाठी घेण्यात आली होती, या आशयाचे पत्र नगरपरिषद अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे. या पत्रामुळे संपूर्ण मनोरा बांधकाम प्रकरणालाच कलाटणी मिळाली आहे. नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य न देता तसेच मनोरा बांधकामाला विरोध असतानाही पालिका प्रशासनाने अजूनही ठोस कारवाईसाठी ठोस पाऊल उचलले नाही. किंबहुना भ्रष्टाचारात लिप्त असलेली यंत्रणा या मोबाइल मनोरा बांधकामाला थांबवेल का? असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. ‘‘आपण सर्व भाऊ-भाऊ नागरिकांच्या जीवाशी खेळून पाहू’’ असा प्रकार सध्या पाहावयास मिळत आहे.
बॉक्स
‘चित भी मेरी पट भी मेरी’
तलाव वाॅर्डातील मोबाइल मनोरा बांधकाम प्रकरणी स्थानिक प्रशासन ‘चित भी मेरी पट भी मेरी’ या भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे संबंधित यंत्रणा प्रकरणाच्या सेटिंगसाठी दबाव आणीत असल्याने स्थानिक प्रशासनाकडेच सेटिंगची सुई वळली आहे. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्याधिकारी मडावी यांनी या प्रकरणात पालिकेत ठराव न घेता मंजुरी दिली कशी? असा मुख्य सवाल आहे. याशिवाय या बांधकामाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आहे काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. वॉर्डातील नागरिक तथा नगरसेवकांच्या पुढाकारात बांधकाम थांबविण्यासाठी निवेदन दिले होते. आता मुख्याधिकारी मूग गिळून का? असा सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालावे, अशी येथील वॉर्डवासीयांची मागणी आहे.