भंडारातील बाजार चौकात दारू विक्रीला अभय कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:29+5:30
शहरात ठिकठिकाणी अवैधपणे दारू विक्रीला उधाण आले आहे. कोरोना काळात त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आला होता. मात्र अनलॉक प्रक्रियेंतर्गत हळूहळू बाजारपेठेची वेळ वाढली आहे. विशेष म्हणजे अत्यंत गजबजलेल्या परिसरात खुलेआमपणे दारूची विक्री होत असते. चक्क ठेल्यावर दारूचा प्याला मांडून मद्यपी बोलत असतात. यावर वचक म्हणून काही महिन्यांपुर्वी येथे पोलिसांची राहूटी उभारून गस्त लावण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात दारू विक्रीसह अवैध व्यवसाय सुरू आहेत, हे सांगितले तर नवीन बाब नाही. परंतु पोलिसांसमक्ष भर चौकात दारू विक्री होत असल्यास कायदा व सुव्यवस्थेची अवस्था काय, असा प्रश्न आपसुकच निर्माण होतो. भंडारा शहरातील मोठा बाजार चौक परिसरात ही स्थिती दिसून येत असून दारू विक्रीला अभय कुणाचे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात ठिकठिकाणी अवैधपणे दारू विक्रीला उधाण आले आहे. कोरोना काळात त्यावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आला होता. मात्र अनलॉक प्रक्रियेंतर्गत हळूहळू बाजारपेठेची वेळ वाढली आहे. विशेष म्हणजे अत्यंत गजबजलेल्या परिसरात खुलेआमपणे दारूची विक्री होत असते. चक्क ठेल्यावर दारूचा प्याला मांडून मद्यपी बोलत असतात. यावर वचक म्हणून काही महिन्यांपुर्वी येथे पोलिसांची राहूटी उभारून गस्त लावण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही राहुटीच तेथून हटविण्यात आली. आता तिच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. दबंगशाहीपणा व मुजोरी करून हा सर्व प्रकार सुरू आहे. याचा सर्वात जास्त फटका येथील सामाजिक वातावरणात दिसून येत आहे. सायंकाळनंतर जणू काही मद्यपींची जत्राच भरलेली दिसून येते. महिला व तरूणी या रस्त्याने जाण्यास धजावत असतात. मुकाटपणे तोंड दाबून तिथून जाण्याशिवाय पर्याय नसतो. उल्लेखनीय म्हणजे आम्ही पोलिसांना हप्ते देत असल्यामुळे कुणी आमचे बिघडवू शकत नाही, असे बोलून दाखविले जात असल्याने कारवाई काय होणार यावर शंका व्यक्त केली जात आहे. असाच प्रकार शहरातील अन्य भागातही सुरू असून संबंधित बीटनिहाय कर्मचारी मालामाल होत असल्याचेही बोलल्या जाते.
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. जिल्हा पोलीस दलात नव्याने आलेले सेनापती म्हणजेच जिल्हा पोलीस अधीक्षकांवर अवैध व्यवसायावर आळा घालण्याची मोठी जबाबदारी आहे. तसा हा जिल्हा नवीन सेनापतींसाठी जुनाच आहे. त्यामुळे अवैधपणे सुरू असलेल्या धंद्यावर वचक घालणे कठीण जाणार नाही. पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्कही जबरदस्त असल्याने तंतोतंत माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे. कुठे दारू व कुठे गांजा विकला जातो. याची माहिती असताना कारवाई होणे गरजेचे आहे.