भंडारा जिल्हा परिषद : जनतेचा कौल काॅंग्रेसला; पण राष्ट्रवादी कुणासोबत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 11:48 AM2022-01-21T11:48:28+5:302022-01-21T11:49:30+5:30

भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते.

who will get power over bhnadara zp | भंडारा जिल्हा परिषद : जनतेचा कौल काॅंग्रेसला; पण राष्ट्रवादी कुणासोबत?

भंडारा जिल्हा परिषद : जनतेचा कौल काॅंग्रेसला; पण राष्ट्रवादी कुणासोबत?

Next
ठळक मुद्देसत्तास्थापनेच्या हालचाली पडद्याआड सुरू

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसले तरी २१ जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून भंडारा जिल्हा परिषदेत पोहोचला. कुणालाही दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. जनतेचा कौल काँग्रेसला असला तरी राष्ट्रवादी कुणासोबत जाणार, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक २१ जागा जिंकत काँग्रेस मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसप एक आणि अपक्षांनी चार जागांवर विजय मिळविला. सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांची आवश्यकता आहे; परंतु हे संख्याबळ कुणाकडेही नाही. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असल्याने सर्वांनी आमच्यासोबत यावे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, निवडणुकीत स्वतंत्र लढलेला राष्ट्रवादी पक्ष काय भूमिका घेतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, तेवढे सहज सोपे नाही. काँग्रेस ‘एकला चलोरे’ या भूमिकेच्या तयारीत आहे. चार अपक्ष, बसप आणि शिवसेनेचा एक सदस्य घेऊन बहुमत काँग्रेसला गाठता येते तर दुसरीकडे काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपही स्थानिक पातळीवर एकत्र येऊ शकते. त्यांच्याकडे चार अपक्ष आले तर त्यांनाही बहुमत मिळविता येते. मात्र, वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो आणि कोण कुणासोबत जातो, हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व समीकरणात राष्ट्रवादी मात्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

अपक्षांच्या मनात येईल तर...

भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते. शिवसेना आणि बसपला साेबत घेतल्यास २७ हा जादूई आकडा पार हाेऊ शकताे. मात्र ‘जर-तर’ आणि ‘अध्यक्षपद’ यासाठी अपक्ष अडून बसल्यास नवल वाटू नये, तशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

पटेल-पटोले यांचे सूत जुळणार काय?

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची चावी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हाती आहेत. मात्र, अलीकडे या दोन नेत्यांची फारशी जवळीक दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हे दोन नेते एकत्रित येणार की नाही, याचीही उत्कंठा जिल्ह्याला लागली आहे.

आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. काँग्रेसची काय भूमिका आहे ते कळले नाही. त्यांच्या भूमिकेनंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

- नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी.

जिल्हा परिषदेत आम्ही मोठा पक्ष आहो. त्यामुळे कुणालाही आमच्या सोबतच यावे लागेल. मात्र, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जातील.

- मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.

Web Title: who will get power over bhnadara zp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.