द्राक्ष, ऊसासाठी वायनरी, मोहफुलांसाठी का नाही?
By admin | Published: December 21, 2015 12:42 AM2015-12-21T00:42:01+5:302015-12-21T00:42:01+5:30
राज्यात द्राक्षांवर आधारित मोठ्या प्रमाणात वायनरी आहेत. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात उस मळीपासून 'वाईन' तयार करणारे कारखाने आहेत.
शासनाची उदासीनता : पूर्व विदर्भात अधिक प्रमाणात मोहफुलाची झाडे
लक्ष्मीकांत तागडे पवनी
राज्यात द्राक्षांवर आधारित मोठ्या प्रमाणात वायनरी आहेत. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात उस मळीपासून 'वाईन' तयार करणारे कारखाने आहेत. परंतु, पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या, औषधी गुणसंपन्न असणाऱ्या मोहफुलापासून 'वाईन'निर्मितीचे कारखाने नाहीत. असे कारखाने उघडून सरकारने मान्यता दिल्यास मागासलेल्या पूर्व विदर्भातील बेरोजगारांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकेल.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात अधिक प्रमाणात मोहफुलाची झाडे आहेत. या झाडांना जानेवारी ते मे महिन्यात अधिक प्रमाणात फुले येतात. मोहाची झाडे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ही झाडाखाली पडणारी फुले गोळा करुन घरी आणून वाळवून त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे येथील जनतेला आर्थिक पाठबळ मिळते. या मोहफुलांवर येथील जनतेचा अर्थसंकल्पच अवलंबून आहे. घरातील लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सारेच मोहफुले गाळा करण्याच्या कामात पहाटेपासूनच दुपारपर्यंत व्यस्त असतात.
औषधी गुणसंपन्न असणाऱ्या या मोहफुलात अधिक प्रमाणात साखर असल्यामुळे साखर टाकण्याची गरज पडत नाही. आजही पूर्व विदर्भात मोहफुलांची हातभट्टीची दारु काढली जाते.
या दारुला सरकारकडून कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे ही दारु काढण्याऱ्यांवर पोलीस कार्यवाही केली जाते. यापुर्वी गावांगावात मोठ्या प्रमाणात ही मोहफुलांची दारु काढली जात असे. आता दारु काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आजही मोहफुल गोळा करणे सुरुच आहे.
पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षासाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात 'वायनरी' आहेत. यांची संख्या जवळपास १५० पर्यंत आहे. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षांच्या वाईनला व उसाच्या मळीच्या दारुला परवानगी दिली जाते. तर विदर्भातील मोहफुलांपासून दारु निर्मितीच्या वाईनरींना परवानगी का देण्यात येत नाही.
मोहफुलाच्या वाईनला परवानगी दिली तर विदर्भात मोठया प्रमाणात मोहफुलांच्या वाईनरीचे उद्योग सुरु होतील. मुख्य म्हणजे या करिता कच्चा माल येथेच आहे. यामुळे येथील मोहफुलांना चांगला भाव मिळून लोकांना आर्थिक मदत होईल.
मोहाचे झाड ठरले कल्पवृक्ष
मोहाचे झाड पूर्व विदर्भातील लोकांसाठी व शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष ठरले आहे. या झाडाचे सर्वच अवयव फायदेशीर ठरले आहेत. या झाडाचे पाने पात्र बनविण्यासाठी उपयोगात येतात. या झाडाची फुले फार उपयोगाची ठरली आहेत. या झाडाची फळे ‘टोर’ यापासून तेल काढले जाते. एक मोहाचे झाड जवळपास पाच हजार रुपयांचे उत्पन्न दरवर्षी देतो. हे झाड नैसर्गीकरित्या वाढते. या झाडाला ना खत दिले जाते, ना पाणी. त्यामुळे या झाडाचा देखभालीचा खर्च काहीच नाही. त्यामुळे हे मोहाचे झाड येथील लोकांचे व शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण उपयोगाचे साधन ठरले आहे.
बहुगुणी, औषधीयुक्त मोहफुले
मोहफुलामध्ये फार मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे. त्यामुळे १५-२० वर्षापुर्वी साखरेच्या ठिकाणी मोहफुलापासून तयार केलेल्या ‘राबी’ चा उपयोग करीत होते. मोहफुलाला पाण्यामध्ये उकळून साखरेचा पाकासारखी ‘राब’ तयार करण्यात येते. ही राब अनेक दिवसपर्यंत टिकून राहते. या राबीपासून लाडू, पापडया, लोऱ्या आदी पदार्थ आजही करण्यात येतात. मोहफुलमध्ये औषधीगुण असल्यामुळे याला आयुर्वेदात फार मोठे महत्व आहे. आजही आदिवासी व इतर समाजात मोहफुलापासून काढण्यात आलेल्या अर्काचा उपयोग अनेक आजारात केला जातो. मोहफुले, पौष्टीक असल्यामुळे गाय, बैल, म्हशी आदींना खायला घातले जातात. मोहफुलानंतर झाडांना ‘टोर’ नावाचे फळे येतात या फळापासून तेल काढण्यात येते हे तेल त्वचेला नरम ठेवण्याचे काम करते हे तेल सौंदर्य प्रसाधने निर्मीती करीता व खाद्यतेल म्हणून उपयोगात आणले जाते.