गुरढा ते गोंडेगाव ७०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:52+5:302021-07-07T04:43:52+5:30

पालांदूर : गत कित्येक दिवसांपासून गुरढा ते गोंडेगाव सातशे मीटरचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला होता. या विषयाला लोकमतने नियमित ...

Widening and asphalting of 700 meter road from Gurdha to Gondegaon! | गुरढा ते गोंडेगाव ७०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण!

गुरढा ते गोंडेगाव ७०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण!

Next

पालांदूर : गत कित्येक दिवसांपासून गुरढा ते गोंडेगाव सातशे मीटरचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला होता. या विषयाला लोकमतने नियमित वाचा फोडली. समस्येची तीव्रता बांधकाम विभागाने तत्परतेने ओळखली. सदर रस्त्याला ७० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

पालांदूर ते मानेगाव हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा १८ किलोमीटरचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा ठरलेला आहे. हा रस्ता दोन टप्प्यात बांधण्याचा निकष बांधकाम विभागाने स्वीकारलेला आहे. यातील पहिला टप्पा गोंडेगाव ते मानेगाव आटोपलेला आहे. गोंडेगाव ते पालांदूर हा अजूनपर्यंत बाकी आहे. मात्र यात गोंडेगाव ते गुरढा हा ७०० मीटरचा रस्ता वर्षभर अपघाताला आमंत्रण देणारा ठरला होता. बांधकाम मोठ्या निधीचा असल्याने विलंब होणार असल्याचे गत वर्षभरापासून बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कळविले होते. परंतु लोकमतच्या सतत पाठपुराव्याने बांधकाम विभागाने सदर ७०० मीटर रस्त्याला ७० लक्ष रुपये नियोजित करून रुंदीकरण व डांबरीकरणाचे नियोजन केलेले आहे. यात रस्त्याच्या दोन्ही कडा रुंदीकरणाकरिता घेतलेले आहेत. रुंदीकरण आटोपल्या नंतर डांबरीकरणाचे नियोजन केले आहे. पावसाने नियमित हजेरी लावल्यास डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होण्याचे संकेत बांधकाम विभाग लाखांदूर यांनी दिले आहे.

गुरढा ते गोंडेगाव या रस्त्यात पावसाळ्याच्या दिवसात व इतर दिवसाच्या रात्रीत बरेच अपघात घडलेले आहेत. या विषयाला न्याय देण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्यांनीसुद्धा तत्परतेने बांधकाम विभागाची संपर्क साधत निधीचे नियोजन करण्याकरिता सहकार्य केले.

पालांदूर ते गोंडेगाव रस्ता डांबरीकरणाला जागोजागी खड्ड्यांनी आश्रय घेतलेला आहे. गत वर्षाला यावर ९ लक्ष रुपये खर्च करीत तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. यावर आणखी थोडीशी डागडुजीची गरज आहे.

कोट

गुरढा ते गोंडेगाव यातील ७०० मीटर रस्त्याच्या दोन्ही कडा पावणेचार ते साडेपाच मीटरपर्यंत रुंदीकरण केले जात आहे. यावर डांबरीकरणाचे काम नियोजित आहे. ७० लक्ष रुपयांचे काम आहे. अर्थसंकल्पीय नियोजनातून बांधकाम मंजूर झालेले आहे. दिवाळीनंतर डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल. गुरढा ते पालांदूर हा रस्ता डांबरीकरणासाठी नियोजनात घातलेला आहे.

दीनदयाल मटाले, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, लाखांदूर.

Web Title: Widening and asphalting of 700 meter road from Gurdha to Gondegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.