भरवस्तीत रानडुकरांचा शिरकाव, तीन बालिकांना केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:46 PM2023-11-08T17:46:11+5:302023-11-08T17:47:21+5:30
मासळ येथील घटना : ग्रामस्थ दहशतीत
लाखांदूर (भंडारा) : सायंकाळच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरासमोर खेळत असलेल्या बालिकांवर गावात प्रवेश केलेल्या रानडुकरांनी धडक दिली. या धडकेत ३ बालिका गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मासळ येथे घडली. यात मासळ येथील कृतिका विवेक भिसे (वय ५), दिशा अरविंद मते (५) व स्वरांशी रत्नपाल भिसे (२) नामक बालिका गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास घटनेतील तिन्ही बालिका स्वतःच्या राहत्या घरासमोर खेळत होत्या. यावेळी परिसरात काही महिला, नागरिक व बालिकांचे पालक देखील उपस्थित होते. यावेळी जंगलातून गावात प्रवेश केलेल्या रानडुकरांनी अचानक भर वस्तीतील घरासमोर खेळत असलेल्या बालिकांना धडक दिली.
या धडकेत तिन्ही बालिका गंभीररीत्या जखमी होताच नागरिकांनी आरडाओरड करून रानडुकरांना हुसकावून लावले. रानडुकराच्या धडकेत जखमी तिन्ही बालिकांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती केले.
घटनेची माहिती स्थानिक लाखांदूर वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जी. डी. हात्ते यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. घटनेत कुटुंबीयांनी रानडुकरांच्या धडकेत जखमी बालिकांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.