अखेर जंगली हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 04:58 PM2022-12-10T16:58:22+5:302022-12-10T17:01:05+5:30
१३ दिवस धुमाकूळ घालून गडचिरोली जिल्ह्यात
भंडारा : जंगली हत्तींच्या कळपाने जिल्ह्यात १३ दिवस धुमाकूळ घालत शुक्रवारी पहाटे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. हत्ती जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. या हत्तींनी साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यांत धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.
साकोली तालुक्यात २७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातून २३ हत्तींचा कळप दाखल झाला होता. सानगडी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव येथे शेतकऱ्यांचे नुकसान केले. २९ नोव्हेंबर रोजी हत्तींच्या कळपाने लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही जंगलात प्रवेश केला. रेंगेपार कोहळी या परिसरात चांगलाच उच्छाद मांडला. शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने उद्ध्वस्त करून मातोश्री गोशाळेची तोडफोड केली. चिचटोला येथे उसाचे नुकसान केले. दिवसभर विश्रांती आणि रात्री धुमाकूळ असा या हत्तींचा दिनक्रम होता. ३ डिसेंबर रोजी देवरी गोंदी परिसरात या हत्तींनी धुमाकूळ घातला. शिवनी, मोगरा, झरप, गडपेंढरी, गिरोला, मुरमाडी तुपकर या परिसरातही हत्तींनी मोठे नुकसान केले.
७ डिसेंबर रोजी हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात शिरला. दिघोरीमोठी परिसरात मालदा परिसरात मोठे नुकसान केले. त्यानंतर दहेगाव माईन्स गावात रात्रीच्या वेळी शिरलेल्या हत्तींच्या कळपाने तीन घरे जमीनदोस्त केली. दहेगाव येथून सोनी इंदोरा मार्गे हत्तींचा कळप शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. हत्तींचा कळप जिल्ह्याबाहेर गेल्याने वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
वनविभागाचा हत्तींवर अहोरात्र होता वाॅच
भंडारा जिल्ह्यात हत्तींचा कळप दाखल झाल्यापासून वनविभाग त्यांच्यावर नजर ठेवून होता. हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाही याची दक्षता घेतली जात होती. उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांच्यासह तब्बल ६० कर्मचाऱ्यांचे पथक हत्तींच्या मागावर होते. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक लक्ष ठेवून होते. हत्ती नियंत्रणासाठी पश्चिम बंगालच्या सेज संस्थेची मदतही घेतली जात होती.
धान पुंजन्यांचे झाले नुकसान
हत्तींच्या कळपाने शेतशिवारात मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजने उधळून लावले होते. यासोबतच रेंगेपार कोहळी येथे गोशाळेचे नुकसान केले तर दहेगाव येथे तीन घरे उद्ध्वस्त केली. वनविभागाच्या वतीने सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नियमानुसार सर्वांना मदत दिली जाणार आहे.