आगीत तणीस जळून खाक वणव्यात वनसंपदा स्वाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 12:27 AM2017-04-14T00:27:02+5:302017-04-14T00:27:02+5:30
तुमसर शहरापासून एक किमी अंतरावरील शेतात भीषण आगीत लाखोंचे तणीस व काही शेतमाल जळून खाक झाला.
तुमसर : तुमसर शहरापासून एक किमी अंतरावरील शेतात भीषण आगीत लाखोंचे तणीस व काही शेतमाल जळून खाक झाला. आग धगधगताना परिसरात खळबळ उडाल्याने पळापळ झाली. ही घटना तुमसर-कोष्टी शिवारात गुरूवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. तुमसर व भंडारा येथील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
तुमसर कोष्टी शिवारात शेतातील तणसीच्या ढिगांना आग लागली. आगीचे डोंब शेत शिवारात दिसत होते. आगीचे तांडव दोन ते तीन तास सुरु होते. तुमसर येथील शेतकरी माधोराव पटेल, मनोज नागुपरे, प्रदीप बावनकर, अनिल बेसरकर, नितीन झाडे या शेतकऱ्यांच्या शेतातील तणीस व शेत माल आगीत भस्मसात झाला. प्रदीप बावनकर यांचा शेतात पोल्ट्री फार्म आहे. त्यांनी नगरसेवक पंकज बालपांडे यांना आगीची माहिती दिली. त्यांनी तुमसर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला सांगितले. अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी भंडारा येथील अग्निशामक दलाला बोलविण्यात आले. तीन तासानंतर आग आटोक्यात आली. आगीत शेतातील लाखो रूपयांची तणीस जळून स्वाहा झाली. घटनास्थळापासून एक किमी अंरावर तुमसर शहर आहे. सध्या शेतशिवार वाळलेले आहे. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. शेकडो नागरिकांनी तुमसर शेतशिवारात धाव घेतली होती. दोन दिवसांपूर्वी शेत शिवारात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. शार्टसर्किटमुळे ही आग तर लागली नसावी ना? अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)