पाण्यासाठी वन्यजीव सैरभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:08 PM2019-04-12T22:08:01+5:302019-04-12T22:08:34+5:30
तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
भंडारा जिल्ह्यात नागझिरा, कोका, पवनी-कºहांडला या अभयारण्यासह अंबागड पहाडी व इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात तृणभक्षी व हिस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार आहे. या जंगलात असलेल्या नैसर्गीक जलस्त्रोतावर वन्यप्राणी आपली तहाण भागवितात. मात्र आता तळपत्या उन्हामुळे जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी सैरभर झाले आहे.
शेतशिवारातही आता ओलीत नसल्याने पाणी मिळत नाही. परिणामी वन्यप्राणी थेट गावात शिरत आहे. गत १५ दिवसापुर्वी लाखांदूर तालुक्यातील एका गावात बिबट शिरला होता. या बिबट्याने एका घरात तब्बल सात तास तळ ठोकला होता. अशीच परिस्थती जंगलालगतच्या अनेक गावांचे आहे. रात्रीच्यावेळी बिबट, रानडुक्कर, रोही आदी प्राणी गावात शिरून पाण्याचा शोध घेतात.
वन्यप्राण्यांनी गावकुसाकडे धाव घेतल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे तृणभक्षी प्राणी पाण्याच्या शोधत असतात. तहाणलेले प्राणी शिकाऱ्याच्या तावडीत सापडतात. वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी याकडे वनकर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते. परिणामी पाण्याचा शोधात वन्यजीवांना गावकुसाचा आधार घ्यावा लागतो.