नदीलगत गावात बांधले वन जलसाठवण तलाव
By admin | Published: July 9, 2016 12:29 AM2016-07-09T00:29:44+5:302016-07-09T00:29:44+5:30
वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देणे व वनातील जलस्तर वाढविण्याकरिता तुमसर वनपरिक्षेत्रात नऊ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले.
तुमसर वनपरिक्षेत्रातील प्रकार : एकाच गावात दोन तलाव
मोहन भोयर तुमसर
वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देणे व वनातील जलस्तर वाढविण्याकरिता तुमसर वनपरिक्षेत्रात नऊ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले. यात नदीजवळील दोन गावात चार वन जलसाठवण तलावांचा समावेश आहे. गावाजवळ तलाव असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही गावे जलयुक्त शिवार योजनेत कशी समाविष्ट झाली आ प्रश्न उपस्थित होत आहे.
सन २०१५-१६ या वर्षात पहिल्या टप्प्यात तुमसर वनपरक्षिेत्राअंतर्गत करडी १, मोहगाव १, देव्हाडा येथे दोन वनसाठवण तलाव तयार करण्यात आले. एका तलावाकरिता २ लक्ष ९४ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. चार तलावांकरिता ११ लक्ष ७६ हजार खर्च करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात येरली १, मेहगाव १, दावेझरी १ व नरसिंगटोला २ असे पाच तलाव तयार करण्यात आले. याकरिता नऊ लाख खर्च करण्यात आले. ३० बाय ३० चे हे वन जलसाठवण तलाव आहेत. पहिल्या टप्प्यातील तलावाकरिता २ लक्ष ९४ हजार तर दुसऱ्या टप्प्यातील तलावाकरिता १ लाख ८० हजारांचा निधी देण्यात आला.
जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दुसऱ्या टप्प्यातील वनसाठवन तलावांचा निधी कमी केला. वनसाठवण तलावाची माती दूरवर घातली तर जास्त निधी व जवळ घातली तर कमी निधी मंजूर केली. पुन्हा सन २०१६-१७ मध्ये या वनपरिक्षेत्रात वन जलसाठवण तलाव तयार करण्यात येणार आहे.
येथे देव्हाडा २ व नगरसिंहटोला येथे २ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले. ही दोन्ही गावे वैनगंगा नदीपासून अवघ्या एक ते दीड कि़मी. अंतरावर आहेत. या गावांचा जलस्तर निश्चितच जास्त आहे. येथे दोन्ही गावात दोन दोन वन जलसाठवण तलावांना मंजुरी कशी देण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे.
वनसाठवण तलाव गाव शिवारात आहेत. गावाजवळ वन्यप्राणी पाणी पिण्याकरिता येतील. बारमाही वैनगंगा नदी वाहते. ३० बाय ३० चे तलाव या वन्यप्राण्यांना दिसणार आहेत काय, गावाजवळ वन्यप्राण्यांना धोका होण्याची शक्यता आहे. गावाचे जलस्तर वाढविण्यासाठी हे तलाव सक्षम आहेत काय, हा प्रश्न असून येथे संबंधितांचे आर्थिकस्तर वाढविण्याचा प्रकार दिसून येतो. वनविभागाने या कामांना मंजूरी कशी दिली हा मुख्य प्रश्न आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रात एकूण नऊ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले. यासर्व वन जल साठवण तलाव असलेली गावे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट आहेत. म्हणून तिथे वन जलसाठवण तलाव बांधण्यात आले.
- अरविंद जोशी,
वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.