आडवाटेने येणार काय भंडाऱ्यात कोरोना ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 02:15 PM2020-04-16T14:15:47+5:302020-04-16T14:16:14+5:30
परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .
राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त करीत आहेत .
कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. जमावबंदी, टाळेबंदीने सगळे घरीच थांबले आहेत. काही व्यवसाय जागीच अडकले आहेत. पण, लोक लॉकडाऊनला न घाबरता व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत. एवढ्यावर न थांबता काही व्यापारी चोर वाटेने दुसºया जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. मोहाडी तालुक्यातील सीतेपार झंझाड, पांढराबोडी, काटी, धूसाळा ही गावे नागपूर जिल्ह्याच्या सीमा रेषेवर आहेत.
नागपूर जिल्ह्यातील व्यापारी या आडमार्गाच्या गावावरून सहजतेने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. सध्या लॉकडाऊन आहे. पोलीस विभागाने भंडारा जिल्ह्याच्या मुख्य मार्गाची सीमाबंदी केली आहे. सीमा बंदस्थानी चोवीस तास पोलीस विभाग तैनात आहेत. परजिल्ह्यातील लोक दुसºया जिल्ह्यात जावू नयेत यासाठी नागपूरचा राज्यमार्ग, खात-रामटेक रोड, शहापूर मार्ग, कांद्री-रामटेक मार्ग, मध्यप्रदेश मार्ग आदी भंडारा जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यातील लोकांना वायगाव, मुरमाडी मार्गाने भंडाºयाच्या सीमेत येता येते. तसेच पांढराबोडी, काटी वरून धानोली, वाकेश्वर मार्ग, धूसाळावरून धानोली, कोदामेडी या आड मार्गानेही नागपूर व कामठी येतील बरीच मंडळी भंडारा जिल्ह्यात पाय ठेवत आहेत. पश्चिमेकडील ही गावे नागपूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर आहेत. त्यामुळे मौदा, कामठी, नागपूर येथील गाय, म्हशी, शेळ्या घेणारे व्यापारी भंडारा जिल्ह्यात दररोज प्रवेश करीत आहेत.
नागपूरच्या उपराजधानीत आतापर्यंत ५६ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झाली आहे. अनेक संशयीत रुग्ण आढळून आली आहेत. त्यामुळे उपराजधानी कोरोनामुळे अधिक धोकादायक स्थितीत आहे. अशा वेळी नागपूर जिल्ह्यातील लोक भंडारा जिल्ह्यात येत असल्याने पांढराबोडी, धूसाळा, काटी, सीतेपार, हरदोली आदी परिसरातील गावातील लोकांमध्ये कोरोना या आडमार्गाने येणार तर नाही ना, ही भीती सतावत आहे.
आता तर ग्रामस्थानी असे आड मार्ग अडविण्यास पुढाकार घेतला आहे. हत्तीडोई येथील ग्रामस्थांनी भीतीमुळे नागपूर वरून येणारा रस्ता बंद केला आहे. हत्तीडोई याही मार्गाने लोक भंडारा जिल्ह्यात शिरत आहेत. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रशासन झाले सतर्क
हरदोली येथील सरपंच सदाशिव ढेंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. या गंभीर विषयाची माहिती दिली. दोन दिवसात असे आड मार्ग बंद केले जातील, असे आश्वस्त जिल्हाधिकाºयांनी केले आहे.