अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: December 8, 2023 02:33 PM2023-12-08T14:33:59+5:302023-12-08T14:34:21+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांचा दिलासा

Will discuss with Chief Minister for compensation of farmers affected by drought; Governor's assurance | अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

अवकाळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; राज्यपालांचं आश्वासन

भंडारा : अलीकडे झालेल्या अवकाळी पावसाची आपणास कल्पना आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले याची देखील जाणीव आहे. त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण मुख्यमंत्री व सरकारसोबत चर्चा करून मदतीचा दिलासा देऊ, अशा शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी भंडारा जिल्ह्यातील अवकाळी lग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल शुक्रवारी भंडारा येथे आले असता शहापूर येथील डिफेन्स सर्विसेस अकॅडमी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री परिणय फुके, पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्त, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपालांच्या भाषणापूर्वी खासदार सुनील मेंढे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्ह्यातील अवकाळीने बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून भरपाईची मागणी केली. तो धागा पकडून राज्यपाल म्हणाले, नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्यांची चर्चा झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास दिली आहे.

अवकाळीने झालेल्या नुकसानीबद्दल सर्वांनीच आपणाकडे चिंता व्यक्त केली आहे. त्याची दखल आपण घेतली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यपाल पुढे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार जनतेसाठी योजना तयार करते. मात्र त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत त्या उपयोगाच्या ठरत नाही. २०४७ पर्यंत पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. ते आपणास पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कालबद्ध रीतीने अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र व राज्य सरकार जनतेला सशक्त करण्याचे काम करत आहे असे सांगून ते म्हणाले, जनतेचा सहभाग यात महत्त्वाचा असून त्यांना लाभ मिळाल्यानंतरच ही विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी होणार आहे. याप्रसंगी खासदार सुनील मेंढे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही आपल्या मनोगतातून विकासासंदर्भातील माहिती दिली. प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यात राबवलेल्या विविध योजनांची आणि जिल्ह्याच्या प्रगतीची आकडेवारीसह माहिती सादर केली. 

जिल्हा विकासाचे ध्येय निर्धारित करा
पुढील पाच वर्षात संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय निर्धारित करून त्यापर्यंत पोहोचा, असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले. शिक्षण ही प्रगतीची आधारशिला आहे. त्यामुळे कौशल्य विकास हा उद्देश घेऊन ही यात्रा देशभर गावागावांमध्ये जात आहे. कारागीर आणि शिल्पकारांना वाव देऊन सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम या माध्यमातून केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध विभागातील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र व लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम स्थळी लावलेल्या स्टॉलची पाहणी करून राज्यपालांनी माहिती जाणून घेतली. चिखली येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

Web Title: Will discuss with Chief Minister for compensation of farmers affected by drought; Governor's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.