ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावाची विकासाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:54 PM2017-09-26T21:54:08+5:302017-09-26T21:54:18+5:30
एकीचे बळ कशाला म्हणतात हे जाणून घ्यायचे असल्यास लाखनी तालुक्यातील शिवणी येथे गेल्यावर त्याची प्रचिती येते. शिवणी ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकीचे बळ कशाला म्हणतात हे जाणून घ्यायचे असल्यास लाखनी तालुक्यातील शिवणी येथे गेल्यावर त्याची प्रचिती येते. शिवणी ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी केली. या अंमलबजावणीतील गावाने विकासाकडे वाटचाल केली आहे. या वाटचालीत पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे.
ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. तथापि ग्रामीण भागात अशुद्ध पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे वैयक्तिक स्वच्छतेअभावी उद्भवणाºया या रोगांमुळे पीडित असलेल्यांची आकडीवारी पाहता हा उद्देश सफल झाल्याचे न जाणवल्याने त्यांचे आरोग्यमान पर्यायाने जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा शासनाच्या विविध योजनांची गावात अंमलबजावणी करण्याकरिता शिवणी ग्रामस्थांनी आता पुढाकार घेतला आहे. सन २०१५-१६ या वर्षापासून शासनाच्या सुधारित मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
शासनाच्या विविध योजना लोकसहभागातून व पारदर्शीपणे राबवून ग्रामपंचायतीला शासनाने विविध पुरस्कार दिले आहे. या लोकोपयोगी उपक्रमात येथील ग्रामपंचायत सदस्यांनीही हिरहिरीने सहभाग घेतला आहे. याचीच प्रचिती म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झालेल्या शिवणी गावाला राज्यस्तरीय चमूने भेट दिली. नागपूर विभागात शिवणी ही ग्रामपंचायत प्रथम असून आता तिचे राज्यस्तरावर नामांकन पक्के झाले आहे.
गावाला भेट दिलेल्या समितीला राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच माया कुथे, उपसरपंच सतीश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास नागलवाडे, भीमराव खांडेकर, गीता शेंडे, रेखा लांडगे, रत्नमाला खांडेकर, मुख्याध्यापक राऊत, मुख्याध्यापक बोरकर, ग्राप. कर्मचारी सुखराम खांडेकर, रोजगार सेवक शेंडे, संगणक परिचालक शेंडे, आरोग्यसेवक, अंगणवाडी परिवेक्षीका, आंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुद्दटवार, पंचायत समिती लाखनीचे खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे, विस्तार अधिकारी चकोले, राऊत आदींनी मार्गदर्शन केले.