शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:04 PM2017-11-30T21:04:40+5:302017-11-30T21:06:33+5:30
आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांनी कर्जमाफिकरिता अर्ज सादर केले. पारदर्शीपणाकरिता हे योग्य जरी असले तरी शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईन तथा आधारकार्ड लिंकींग सपशेल फेल ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांनी कर्जमाफिकरिता अर्ज सादर केले. पारदर्शीपणाकरिता हे योग्य जरी असले तरी शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईन तथा आधारकार्ड लिंकींग सपशेल फेल ठरली आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याकरिता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा धानाची पेंढी संसद परिसरात जाळणार असून शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
रेंगेपार येथे आयोजित शेतकरी मेळावा व ६० घरकुल बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रमेश पारधी होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.माजी सभापती कलाम शेख, पं.स. चे गटनेते हिरालाल नागपुरे, माजी सरपंच शिवलाल नागपूरे, सरपंच कौसल नागपुरे, उपसरपंच हेमलता हरडे, खंडविकास अधिकारी आर.एम. दिघे, नायब तहसीलदार निलेश गौंड, उपविभागीय वीज अभियंता रूपेश अवचट, गजानन झंझाड, माजी पं.स. सदस्य बंटी बानेवार उपस्थित होते.
खा. नाना पटोले म्हणाले, यावर्षी धान पिकावर तुडतुडा किडीचे संक्रमण झाल्याने धान पिक उद्वस्त झाले. शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ १० टक्के पीक झाले आहे. विमा कंपनीकडून शेतकºयांना आर्थिक मदत शासनाने मिळवून देण्याची गरज आहे. विमा कंपनीत शेतकºयांनी पैसे भरले ते त्यांना परत मिळणे गरजेचे आहे. सरकार येथे जर गंभीर नसेल तर येत्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद भवन परिसरात पुन्हा धानपेंढी जाळण्याची पुरावृत्ती करणार आहे. माझे पद गेले तरी चालेल. शेतकºयांवरील अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा खा. पटोले यांनी दिला.
तत्पूर्वी रेंगेपार पूरग्रस्तांकरिता ६० घरकुल कामांचे भूमिपूजन खा. नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले. यापूर्वी १५ घरकुल मंजुर झाले होते. याप्रसंगी माजी. जि.प. सदस्य अशोक उईके, कमलाकर निखाडे, बालकदास ठवकर, प्रमोद कटरे, मिलिंदभाऊ अंबादास कानतोडे, जयदेव नागपूरे, आशा तिवाडे, भारती दमाहे, विजय दमाहे, नरेंद्र पेशने, मुकूंदा आगाशे, रूपलाल आगाशे तथा देवस्थान कमिटी सदस्य व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संयोजक हिरालाल नागपूरे यांनी मानले.