मागील दुष्काळाची पुनरावृत्ती होईल का?
By admin | Published: August 22, 2016 12:26 AM2016-08-22T00:26:26+5:302016-08-22T00:26:26+5:30
कधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी हवालदिल : नैराश्याच्या गर्तेत शेतकरी
विलास बन्सोड उसर्रा
कधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील सतत दोन वर्षापासून दुष्काळाचे चक्र सुरु आहे. तेव्हा यंदाही मागील दुष्काळाची पुनरावृत्ती होईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
सुरुवातीला वरुन राजाच्या उशिरा झालेल्या आगमनाने शेतकरी चिंतातूर होता. चातक पक्षाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता. अखेर मेघ बरसले व शेतकरी कामाला लागला. अशातच जास्त पाणी आल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे कुजून नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यानंतर मुख्य रोवणी झाल्यानंतर काही दिवसातच धान पिकाला लष्करी अळीमुळे धानपिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
उसर्रा परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टाकला, बपेरा (आंबागड), टांगा, सालई (बुज), धोप, ताडगाव, सिहरी आदी भागात तर लष्करी अळीनी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. यातच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे मन समाधान करुन काही उपाययोजना सुचविल्या, पण निसर्गाच्या या अवकृपेमुळे मात्र पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी कुणी सेवा सहकारी सोसायटी मधून, कुणी सहकारी पतसंस्थेकडून तर कुणी सोने गहाण करुन एवढेच नव्हे तर कुणी अैवध सावकारी व्यक्तीकडून कर्ज काढून शेती लागवड केली. पण यंदाही शेतकऱ्यांच्या हाती भातपिके भेटतात की नाही, अशी बिकट अवस्था सध्या शेतकऱ्यांना सर्व दूर दिसत आहे. शेतकरी संपूर्णत: नैराशेच्या गर्तेत सापडला असून मागील दोन वर्षापासून असलेले कर्ज कसे फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या शेतावर असलेले लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी आपल्या शेतीकडे पाठ फिरवत असतानाचे चित्र सर्वदूर दिसत आहे. शेती आतापासूनच कोरडी व्हायला लागली आहे.
धान पिकासाठी पेंचचे पाणी सोडा
भंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी धानाला सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य प्यारेलाल वाघमारे यांनी नागपूर विभागाचे पाटबंधारे व्यवस्थापन कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांना धानासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी भंडारा सर्कलला सोडण्यात यावे, शेतकऱ्यांच्या निंदनासाठी तसेच लष्करी अळी धानावर लागल्यामुळे औषधी फवारणीकरीता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. काही प्रमाणात धानाची रोवणी अडकलेली आहेत. त्याकरीता पेंच प्रकल्पाचे पाणी त्वरीत सोडण्यात यावे, यामध्ये हत्तीडोई, मोहदुरा, जाख, गुंजेपार, नवेगाव, टवेपार, खुर्शीपार, पांढराबोडी, भोजापूर, केसलवाडा, शुक्रवारी तसेच सोनुली, दाभा, जमनी या गावातील शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे,अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्यारेलाल वाघमारे यांनी निवेदनातून दिला आहे.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव असून यावर कृषी विभागाकडून उपाययोजना व शेतकऱ्यांना भेटून सल्ला देण्याचे काम सुरु आहे. पंजाबराव कृषि विद्यापिठ यांनी सुचविलेल्या प्रमाणे डायक्लोरीवास औषघीची मागणी केली आहे.
- किशोर पात्रीकर,
तालुका कृषी अधिकारी मोहाडी