मृत्यूनंतरही तरी ‘रश्मी’ला न्याय मिळणार की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:21 PM2018-05-02T22:21:31+5:302018-05-02T22:21:52+5:30
मुलीच्या संरक्षणार्थ कायदे असले तरी कायद्याच्या चाकोरीत मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? कायद्याचा मुलीच्या सुरक्षेसाठी उपयोग होतो का? कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस सजग आहेत का? असे विविध प्रश्न असले तरी मुलींना अपेक्षेप्रमाणे संरक्षण मिळत नसल्याचा प्रकार साकोली येथील रश्मी साखरे या मुलीशी घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मुलीच्या संरक्षणार्थ कायदे असले तरी कायद्याच्या चाकोरीत मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? कायद्याचा मुलीच्या सुरक्षेसाठी उपयोग होतो का? कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस सजग आहेत का? असे विविध प्रश्न असले तरी मुलींना अपेक्षेप्रमाणे संरक्षण मिळत नसल्याचा प्रकार साकोली येथील रश्मी साखरे या मुलीशी घडला. अखेर छळाला कंटाळून रश्मीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. रश्मीला जिवंतपणे न्याय मिळालाच नाही मात्र मृत्यूनंतरही न्याय मिळणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
रश्मी साखरे ही आत्यासोबत साकोली येथे राहत होती. अभ्यासात हुशार असून दिसायला सुंदर होती. स्वभावही मितभाषी होता. तिचे बीएससीपर्यंत शिक्षण झाले होते. भावी आयुष्याचे स्वप्न रंगवित ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. अभ्यास करून नोकरी मिळवून समाजाची सेवा करायची तिची धडपड होती. मात्र काही कंटकांनी तिचे जगणे असह्य केले होते. या त्रासाला कंटाळून तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पोलिसांनी रश्मीचे बयाण नोंदविले. त्यावेळी रश्मीने आत्महत्येचे कारण सांगून त्रास देणाऱ्यांची नावे सांगितली. पोलिसांनी रश्मीच्या बयाणावरून दोघा जणाविरूद्ध गुन्हा नोंदविला. मात्र आठ दिवसाचा कालावधी लोटूनही आरोपीचा पोलीस आरोपींना शोधू शकले नाही.
तपास बदलला, पोलिसांवर दबाव
घटनेनंतर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांच्याकडे देण्यात आला. मात्र दोन दिवसापूर्वी पोलीस अधीक्षकांनी हा तपास वर्मा यांच्याकडून काढून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्याकडे दिला आहे. एका निष्पाप मुलीचा जीव गेला. घटनेला आठ दिवस लोटूनही तपास धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे पोलीस दबावात येऊन तपास करीत नाही ना? अशी चर्चा आहे.
निवेदनातून आंदोलनाचा इशारा
आठ दिवसापासून आरोपी पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे तपासाला गती यावी आणि तपास प्रामाणिकपणे व्हावा यासाठी कैलास गेडाम यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. आरोपींना न शोधल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गेडाम यांनी दिला आहे. रश्मीला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आता काही सामाजिक संघटना एकवटल्या असून न्यायासाठी ते एकत्र येत आहेत.
एका आरोपीचे आत्मसमर्पण
या घटनेत सहभागी असलेल्या युवराज शहारे (३९) या आरोपीने बुधवारला साकोली पोलीस ठाण्यात स्वत:हून आत्मसमर्पण केले. याबाबत विचारले असता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी याबाबीला दुजोरा दिला.