गणपती उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:26 AM2024-09-11T11:26:39+5:302024-09-11T11:29:01+5:30
रेशनधारकांचा प्रश्न : अद्यापही दुकानदारांकडे शिधा पोहोचलाच नाही
अमोल ठवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पहेला : गौरी-गणपती सणाचा आनंद द्विगुणित हवा, यासाठी राज्य सरकारकडून प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जाणार होता. तशी घोषणा राज्य शासनाने यापूर्वीच केली आहे. यंदा गौरी मातेचा निरोप देण्यात येऊन गणेशोत्सव धडाक्यात सुरू आहे. परंतु, अद्यापही आनंदाचा शिधा वितरित झालेला नाही. यंदाच्या गणपती उत्सवात आनंदाचा शिधा मिळणार की, पुढील सणाची प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न रेशन कार्डधारकांकडून विचारला जात आहे.
गणपतीच्या आगमनामुळे घराघरात चैतन्याचे वातावरण आहे. बाप्पासाठी नैवेद्याच्या रूपाने घरोघरी गोड पदार्थ तयार केले जातात. याच पार्श्वभूमीवर सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेशोत्सवाचे निमित्त साधून पात्र कुटुंबांना अवघ्या १०० रुपयात आनंदाच्या शिधा देण्याचा निर्णय घेतला.
शासन चार जिन्नस मोफत देणार आहे. परंतु, पहेला परिसरात रेशन दुकानदाराच्या गोडाऊनपर्यंत आनंदचा शिधा पोहोचलाच नाही. गणपती उत्सवाचे चार दिवस उलटून गेले. आणखी किती वाट पाहायची, असा प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गणेश उत्सव डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त शंभर रुपयात चणा डाळ, तेल, साखर, रवा असे चार जिन्नस मिळणार आहेत. यात चणा डाळ एक किलो, सोयाबीन तेल एक लीटर, साखर एक किलो आणि रवा एक किलो मिळेल. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांचा सण गोड व्हावा, यासाठी सरकार हा उपक्रम आहे. मात्र, यासाठी काही अटीसुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे.
तुम्हीच सांगा, कसा मिळणार गोडवा?
एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक झाली. आचारसंहितेमुळे दोन महिने आनंदाचा शिधा मिळालाच नव्हता. मात्र, गणेश उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार होता. परंतु, अद्यापही रेशन दुकानदारांच्या गोडाऊनपर्यंत आनंदाच्या शिधाची किट पोहोचली नाही. गणपती उत्सवात गोडवा कसा निर्माण होणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
१०० रुपयात आनंदाचा शिधा
आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल ५६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना शंभर रुपये भरून सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार होता. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही आनंदाचा शिधा मिळणार होता.