लाखनीत पाच प्रभागांमध्येही जोरदार लढती होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 02:18 PM2021-11-22T14:18:08+5:302021-11-22T14:19:40+5:30

एकूण १७ प्रभागांपैकी ९ प्रभागांत महिलाराज आहे. पाच प्रभागात राजकीय समीकरण बदलाची शक्यता आहे, तसेच या प्रभागात जोरदार लढती होण्याचे संकेत आहेत.

Will there be fierce fighting in five wards in Lakhni? | लाखनीत पाच प्रभागांमध्येही जोरदार लढती होणार?

लाखनीत पाच प्रभागांमध्येही जोरदार लढती होणार?

Next
ठळक मुद्देफेरआरक्षण सोडतीनंतर लाखनी नगरपंचायतीत चुरशीचे संकेत

चंदन मोटघरे

भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या लाखनी नगरपंचायतीच्या फेरआरक्षण सोडतीनंतर नगरपंचायतीची निवडणूक लढत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. एकूण १७ प्रभागांपैकी ९ प्रभागांत महिलाराज आहे. पाच प्रभागात राजकीय समीकरण बदलाची शक्यता आहे, तसेच या प्रभागात जोरदार लढती होण्याचे संकेत आहेत.

लाखनी तालुक्यातील लाखनी हे गाव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असून, साकोली विधानसभा क्षेत्रात चर्चेत असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लाखनी शहरात भाजप पहिल्या क्रमांकावर असते; पण जेव्हा स्थानिक नगरपंचायतीची निवडणूक असते तेव्हा भाजप दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर फेकली जाते. हे एक भाजपसाठी कोडेच बनले आहे. लाखनी नगरपंचायत निवडणुकीत संपूर्ण राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. लाखनी ग्रामपंचायत बरखास्त करून २०१५ मध्ये लाखनी नगरपंचायत अस्तित्वात आली. पहिल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अडीच वर्षे काँग्रेसची सत्ता होती, तर अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामध्येच या शहराची राजकीय समीकरणे केंद्रित होतात. त्यामुळे येथील निवडणुकीत बदलाचे आणि परिवर्तनाचे वारे कायम वाहत राहिले आहे. हा विषय लाखनीवासीयांसाठी कायमच चर्चेचा ठरला आहे.

लाखणी नगरपंचायतीत आगामी काळात राजकीय मांडवली करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रभाग क्रमांक ३, ९, १२, १४, १६ सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले असून, प्रभाग क्रमांक २, ४, ८, १३ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत, तर प्रभाग क्रमांक १०, ११ नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये जोरदार लढतीचे संकेत आहेत.

या प्रभागात इच्छुकांची भाऊगर्दी, ताईगर्दी होणार आहे. त्यासाठी आतापासूनच पदाधिकारी तयारीला लागले आहेत. दरम्यान, कोरोना काळात समाजसेवेचे दर्शन दिल्याने पदाधिकाऱ्यांनी आपले बस्तान बसवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवले होते. सुधारित फेरआरक्षण सोडतीमुळे अंशतः बदल झाला आहे; परंतु खुल्या गटातील लढतीसाठी स्थानिक नेत्यांना उमेदवार निवडीसाठी दमछाक करावी लागणार आहे. सध्या या पाच प्रभागांमध्ये बरोबर उमेदवारी देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. त्यामुळे समीकरण बदलाचे संकेत आहेत.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणार?

आगामी होऊ घातलेल्या लाखनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आखाडा तापणार आहे. नगरपंचायतीत सत्ता स्थापन करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून व स्थानिक गटातटांत जोरदार चुरस पाहावयास मिळणार आहे. सध्या वादळापूर्वीची शांतता असली तरी नवीन वर्षात धुमशान पेटणार आहे. हे मात्र निश्चित!

दोन्ही तबल्यांवर हात

एकूण पाच प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या प्रभागांत इच्छुकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना स्थानिक हायकमांडची परीक्षाच आहे. यावेळी बंडखोरी रोखण्यासाठी इच्छुक उमेदवार दोन्ही तबल्यांवर हात ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण १७ प्रभागांपैकी ९ प्रभागांत महिला आरक्षण आहे. त्यासाठी कुटुंबातील महिला सदस्यांना संधी मिळावी, असे दबावतंत्र वापरले जाऊ शकते.

Web Title: Will there be fierce fighting in five wards in Lakhni?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.