कामाचे तास वाढणार पण वेळेवर काम होणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:42+5:30
पाच दिवसाच्या आठवड्यावर ‘लोकमत’ने सर्वसामान्य नागरिक आणि अधिकारी, कर्मचाºयांशी संवाद साधला. तेव्हा विरोधाभाषी चित्र पुढे आले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात वेळेवर कामच होत नाही. त्यामुळे आठवडा कितीही दिवसाचा केला तरी आम्हाला त्याचा उपयोग काय, असे अनेकांचे म्हणजे होते. परसोडी येथील शेतकरी दौलत वंजारी म्हणाले, शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला.
संतोष जाधवर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने आता पाच दिवसाचा आठवडा केला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाºयांच्या कामांचे तास वाढणार आहे. मात्र कामाचे तास वाढले तरी अधिकारी, कर्मचारी जागेवर भेटतील काय आणि काम वेळेवर होईल काय, असा सवाल अनेक सर्वसामान्य नागरिकांनी केला. तर शासकीय कर्मचारी म्हणतात ९.४५ वाजता कार्यालयात पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल.
पाच दिवसाच्या आठवड्यावर ‘लोकमत’ने सर्वसामान्य नागरिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा विरोधाभाषी चित्र पुढे आले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने शासकीय कार्यालयात वेळेवर कामच होत नाही. त्यामुळे आठवडा कितीही दिवसाचा केला तरी आम्हाला त्याचा उपयोग काय, असे अनेकांचे म्हणजे होते. परसोडी येथील शेतकरी दौलत वंजारी म्हणाले, शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला. त्याला आमची कोणतीही हरकत नाही. परंतु ठरवून दिलेल्या वेळेत आमचे काम व्हावे. अनेकदा शासकीय कार्यालयात गेल्यावर साहेब जागेवरच भेटत नसल्याचे सांगितले.
शासकीय कार्यालयाबाहेर झेरॉक्सचा व्यवसाय करणारे भाऊराव बांते यांना आपल्या व्यवसायावर याचा परिणाम होण्याची चिंता सतावत होती. शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुट्टी येत असल्याने आम्हालाही दोन दिवस काम बंद ठेवावे लागेल. त्यामुळे दोन दिवसांचा आमचा रोजगार बुडेल, असे सांगितले. एक तरूण नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर उपरोधिकपणे म्हणाला, सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा हा निर्णय आहे. पूर्व एखाद्या कामासाठी सरकारी कार्यालयात सहा दिवस उंबरठे झिजवावे लागत होते. आता पाचच दिवस उंबरठे झिजवावे लागेल, असे तो म्हणाला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी नेहा शेंदूरकर हिने सायंकाळी वाढलेल्या वेळामुळे महिला कर्मचाºयांना सुरक्षीतपणे घरी जाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगितले. भंडारा तालुक्यातील आमगावचे गोपीचंद सखीबावणे म्हणाले, येथे सहा दिवसाचा आठवडा असताना काम होत नाही आता पाच दिवसाचा आठवडा झाला तरी नेमके काम कसे होणार. तास वाढवून काही फायदा होणार नाही. अनेक कर्मचारी तर सकाळी ११ वाजताच टी-टाईमला जातात आणि दुपारपर्यंत कार्यालयाकडे फिरकत नाही, अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक तरी कोण ठेवणार. शासनाचा निर्णय चांगला असला तरी भारतीय कर्मचाºयांची मानसीकताच काम करण्याची दिसत नाही. त्यामुळे पाश्चात्य देशाप्रमाणे आपल्याकडे पाच दिवसांचा आठवडा म्हणजे कर्मचाºयांसाठी केवळ मौजमजा ठरेल, असे अनेकांनी सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड म्हणाले, या निर्णयाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून पाच दिवसाचा आठवडा आहे. वाढत्या रिक्त पदांचा भार अधिकारी, कर्मचाºयांवर असल्याने त्यांना पाच दिवसाच्या आठवड्याने कुटुंबासाठी वेळ देता येईल, असे सांगितले. मात्र सलग सुट्या आल्यास नागरिकांना त्याचा फटकाही बसू शकतो, असे ते म्हणाले. ग्रामसेवक शशी गाढवे म्हणाले, आम्ही एक दिवस गावात गेलो नाही तरी गावातून फोन येतात. सुटीचा दिवस असला तरी कामावर जावेच लागते. हा निर्णय आमच्या सारख्या कर्मचाºयांचा उपयोगाचाच नाही.
सलग सुट्यांनी होणार कामाचा खोळंबा
शासकीय कर्मचाºयांना आता शनिवार, रविवार अशी दोन दिवसाची सुटी मिळणार आहे. मात्र शुक्रवारी अथवा सोमवार शासकीय सुटी आल्यास तीन दिवसाची सुटी मिळणार आहे. यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होणार आहे. एखाद्या कर्मचाºयाने यादरम्यान सुटी टाकल्यास पाच दिवस त्याच्या टेबलवरील काम प्रलंबित राहिल.
अप-डाऊन कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कामाच्या वेळाही वाढविण्यात आले आहे. सकाळी ९.४५ ते ५.३० अशी वेळ शासकीय कार्यालयाची राहणार आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात कर्मचारी शहराच्या ठिकाणावरून अपडाऊन करतात. पूर्वी १०.३० वाजेपर्यंत कार्यालयात ही मंडळी वाहनाने प्रवास करून पोहचत होती. मात्र आता ९.४५ वाजताच कार्यालयात हजर रहावे लागणार आहे. अनेक शासकीय कार्यालयात थम्ब मशीन लावण्यात आली आहे. त्यामुळे वेळेवर पोहचण्यासाठी या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. अनेक कर्मचारी १०० ते १५० किलोमीटर अंतराचा प्रवास करून कार्यालय गाठतात. त्यांना आता घरून लवकर निघून रात्री उशिरा पोहचावे लागणार आहे. त्यामुळे अशा अप-डाऊन करणाºया कर्मचाºयात धास्ती दिसत आहे.