पवनीत दंडात्मक कारवाई सुरूच
By admin | Published: May 27, 2017 12:24 AM2017-05-27T00:24:06+5:302017-05-27T00:24:06+5:30
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पवनी शहर सुंदर, स्वच्छ व निरोगी बनविण्याच्या दृष्टिकोनातून दंडात्मक कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पवनी शहर सुंदर, स्वच्छ व निरोगी बनविण्याच्या दृष्टिकोनातून दंडात्मक कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात या अनुषंगाने दंडात्मक कार्यवाही करून १२ हजार रुपये दंड वसूल केला होता. मटन मार्केटमधील व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारचे टाकाऊ, घाण, कचरा, इतरत्र न फेकता कचरापेटीचा वापर करावा, अशा प्रकारच्या सूचना माधुरी मडावी यांनी दिल्या. त्यांना नोटीसदेखील बजावली. त्यानंतर सूचना देऊनही व्यावसायिकांनी नियमाची पायमल्ली केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पवनी शहरातील गौतम वॉर्डात न. प. द्वारा सुंदर बगीचा तयार करण्यात आला होता. परंतु या बगीच्याची मालमत्ता आपली समजून लोकांनी येथील सर्व वस्तू लंपास केल्या बगीच्याच्या दरवाजाची तोडफोड केली. आतमध्ये शेळ्या, मेंढ्या जाऊ लागल्या. बगीच्याचे स्वरुप बदलून गेले. एवढेच नाहीतर या बगीच्यालगत शेतकऱ्यांनी आपआपली जनावरेदेखील बांधायला सुरुवात केली. कित्येकांनी शेणाच्या खताचे खड्डे तयार केलेत व त्याठिकाणी शेण व कचरा टाकू लागले बगीच्याला लागून असलेले न. प. ची मोकळी जागा शेणाच्या खड्डयांनी व्यापून टाकली. या अनुषंगाने लोकांच्या तक्रारी न.प. कडे येऊ लागल्या आहेत. परंतु त्याची दखल न.प. ने घेतली नाही. मात्र नव्याने मुख्याधिकारी म्हणून रूजू झालेल्या माधुरी मडावी यांनी १५ दिवसांपूर्वी सर्व कास्तकारांना ज्याचे शेणाचे खड्डे आहेत, अशांना नोटीस बजावली व कार्यवाहीला सुरुवात केली.
जेसीबीच्या साहाय्याने सर्व शेणखड्डे सपाट करून त्यातील शेणखत व कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला. न.प. मुख्याधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद आहे. परंतु काही व्यावसायिकांनी व दुकानदारांनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणाचे प्रकरण न.प. मध्ये पडले आहेत. याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घेऊन सर्वांवर समान कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.