मित्रांच्या मदतीने साळ्यानेच केला दारूड्या जावयाचा खून; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:09 PM2023-01-31T12:09:05+5:302023-01-31T12:10:27+5:30
पळसगाव येथील तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले
चिचाळ (भंडारा) : गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले असून मित्रांच्या मदतीने साळ्याने जावयाचा खून केल्याचे पुढे आले. या प्रकरणी चौघांना अटक केली असून दारूडा जावई बहिणीला त्रास देत असल्याने खून केल्याची कबुली साळ्याने दिली.
मंगेश प्रेमलाल वाढई (३५, रा.पळसगाव ता. साकोली) असे मृताचे नाव आहे. तर साळा विलास केवलदास ऊके (३०) रा. भोसाटाकळी, प्रमोद साकोरे (३५) रा.खोकरला, जितेंद्र अंबादे (३५) रा.शिंगोरी, नरेंद्र आगरे (३२) रा. मानेगाव अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. २७ जानेवारी रोजी मंगेशचा मृतदेह पवनी तालुक्यातील गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये चकारा चिचाळ मार्गावरील एका पुलाखाली आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
मंगेशला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीचा नेहमी छळ करीत होता. जावयाने दारू सोडवावी म्हणून साळ्याने विविध प्रयत्न केले. जावई मंगेशला १९ डिसेंबरला भंडारा येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठविले; मात्र २२ जानेवारी रोजी मंगेश पळसगाव येथे पळून आला. त्यानंतर साळा विलास ऊके मित्रांसोबत पळसगाव येथे २५ जानेवारीला आला. मंगेशला पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेले; मात्र त्यानंतर मंगेशचा संशयास्पद स्थितीत मृतदेहच आढळून आला होता.
पिकअप वाहनातून आणून धरणात फेकला मृतदेह
या प्रकरणी मंगेशची आई कासुबाई बाढई यांनी अड्याळ ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र मृतदेह आढळला तेथे मंगेशचे कोणतेच साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून असल्याचे पुढे आले. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातखेडे, पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी तपास सुरू केला. त्यात साळ्याने मित्रांच्या मदतीने खून केल्याचे पुढे आले.
चौघांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविताच आरोपी पोपटासारखे बोलायला लागले. जावयाचा खून करून मृतदेह पिकअप वाहनाने आणून पुलाखाली टाकल्याची कबुली दिली. तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलिस उपनिरीक्षक हरिचंद्र इंगोले, सुभाष मस्के, संदीप नवरखेडे, सुभाष राहांगडाले, भुमेश्वर शिंगाळे करीत आहेत.