सहा केंद्राचा परवाना रद्द तर २९ कृषी केंद्रांची विक्री बंद

By admin | Published: June 16, 2016 12:50 AM2016-06-16T00:50:35+5:302016-06-16T00:50:35+5:30

खरीप हंगामाला प्रारंभ होत असताना कृषी विभागाने जिल्ह्यातील ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात २९ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश बजावले आहे.

Withholding of six center licenses and sale of 29 agricultural centers | सहा केंद्राचा परवाना रद्द तर २९ कृषी केंद्रांची विक्री बंद

सहा केंद्राचा परवाना रद्द तर २९ कृषी केंद्रांची विक्री बंद

Next

अनियमितता भोवली : ३५ कृषी केंद्रांवर कारवाई
भंडारा : खरीप हंगामाला प्रारंभ होत असताना कृषी विभागाने जिल्ह्यातील ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात २९ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश बजावले आहे. तर सहा कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आले. भरारी पथकाने ऐन हंगामाच्या तोंडावर ही कारवाई केल्याने कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात बि-बियाणे व खतांचा पुरवठा करता यावा, यासाठी कृषी विभागाच्या अखत्यारित कृषी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात भरारी पथकाची नेमणूक केली आहे. खरीप हंगामाला सुरूवात होत असल्याने या भरारी पथकाने कृषी केंद्र तपासणी केली असता भंडारा जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली.
यात काही कृषी सेवा केंद्रधारक विना परवाना कृषी निविष्ठा विक्री करीत होते. तपासणीत खते, बियाणे व किटकनाशके विक्रीचा परवाना नसतानाही अनधिकृतरित्या विक्रीचा व्यवहार सुरू असल्याचे आढळून आले. यामुळे भरारी पथकाने २९ कृषी केंद्राचे परवाने विक्री बंद करण्याचे आदेश बजावले आहे.
सहा कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अशा ३५ कृषी केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही कारवाई महिन्याभरात करण्यात आलेली आहे. अनेकांविरूध्द पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)

या केंद्रांवर करण्यात आली कारवाई
विक्री बंद आदेश हे २१ दिवसांसाठी असून परवाना रद्द हा कायमस्वरूपी करण्यात आलेला आहे. ज्या २९ कृषी केंद्रांवर विक्री बंदची कारवाई केली त्यात २४ बियाणे, एक खत व चार किटकनाशक विक्री करणारे कृषी केंद्र आहेत. तर परवाना रद्द करण्यात आलेल्या सहा कृषी केंद्रांमध्ये दोन बियाणे, तीन खत व एक किटकनाशक विक्री करणाऱ्या कृषी केंद्राचा समावेश आहे.
तालुकानिहाय कारवाई
जिल्हा कृषी विभागाच्या अखत्यारित असलेल्या कृषी केंद्र संचालकांकडून शासकीय नियमांना बाजूला सारून कृषी खते व बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू होता. दरम्यान भरारी पथकाने ३५ कृषी केंद्रांवर कारवाई केली. यात तालुकानिहाय याप्रमाणे, भंडारा सहा, लाखनी तीन, मोहाडी सहा, साकोली ११, पवनी तीन, लाखांदूर तालुक्यातील सहा कृषी केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कृषी केंद्रांची स्थिती
जिल्ह्यात १ हजार ६०० कृषी केंद्र आहेत. त्यात ४८२ कृषी केंद्रांना बियाणे विक्रीचा परवाना देण्यात आलेला आहे. ६८६ कृषी केंद्रांमधून खतांची विक्री होते. तर ४३२ कृषी केंद्रांमधून किटकनाशकांची विक्री होते. सर्वाधिक २८६ कृषी केंद्र तुमसर तालुक्यात आहेत. मोहाडीत २८०, भंडारा २३८, पवनी २२८, लाखांदूर २१६, साकोली १८८ तर लाखनी तालुक्यात १६४ परवानाधारक आहेत.

Web Title: Withholding of six center licenses and sale of 29 agricultural centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.