दोन वर्षांतच सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:42 AM2021-02-17T04:42:06+5:302021-02-17T04:42:06+5:30
माहितीनुसार गत दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील ढोलसर- मांढळ या रस्त्यांतर्गत जवळपास दीड किमी. लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात ...
माहितीनुसार गत दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील ढोलसर- मांढळ या रस्त्यांतर्गत जवळपास दीड किमी. लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले. या रस्ता बांधकामांतर्गत मासळ-विरली (बुज) या मार्गावरून ढोलसर फाटा ते मांढळकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम होताना ढोलसर गावांतर्गत मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. बांधकाम करण्यात आले. मात्र, बांधकाम यंत्रणेच्या दुर्लक्षाने कंत्राटदाराने निकृष्ट बांधकाम केल्याची माहिती आहे.
सदर बांधकाम केलेल्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध व सबंध रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसत आहे. रस्त्यावर व रस्त्याच्या मधोमध असल्याने या मार्गावरून दुचाकीने सावधतेने प्रवास न केल्यास मोठा अपघात होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सदर रस्ता बांधकाम होऊन केवळ दोनच वर्षे झाले असताना या रस्त्यावरील बांधकाम माहिती फलकदेखील गायब करण्यात आले आहेत. सदर फलक गायब करण्यात आल्याने या रस्ता बांधकामाविषयक आवश्यक माहिती हेतुपुरस्पर दडविल्या जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. तथापि या रस्ता बांधकामात प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत कार्यरत तत्कालीन अभियंता व कंत्राटदारांनी संगनमताने प्रचंड गैरव्यवहार केल्याचा संशय घेत अवघ्या दोन वर्षांत सिमेंट रस्त्याला भेगा पडल्याने या रस्ता बांधकामाची चौकशी करून दोषींविरोधात कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील जनतेत केली जात आहे.