दोन वर्षातच सिमेंट कॉन्क्रेट रस्त्याला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:24 AM2021-02-19T04:24:56+5:302021-02-19T04:24:56+5:30
गत दोन वर्षापूर्वी तालुक्यातील ढोलसर -मांढळ या रस्त्यांतर्गत जवळपास १.५ किमी.लांबीच्या सिमेंट कॉन्क्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम ...
गत दोन वर्षापूर्वी तालुक्यातील ढोलसर -मांढळ या रस्त्यांतर्गत जवळपास १.५ किमी.लांबीच्या सिमेंट कॉन्क्रिट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आले. या रस्ता बांधकामांतर्गत मासळ -विरली(बुज) या मार्गावरुन ढोलसर फाटा ते मांढळकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. सदर बांधकाम होतांना ढोलसर गावांतर्गत मार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले. सदर बांधकाम जवळपास १.५ किमी अंतरापर्यंत करण्यात आले. मात्र बांधकाम करणाऱ्या यंत्रणेच्या दुर्लक्षाने कंत्राटदाराने प्रचंड फायदा उचलत अत्यंत निकृष्ट बांधकाम केल्याची ओरड आहे.
सदर बांधकाम केलेल्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध व सबंध रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे दिसत आहे. दरम्यान या रस्त्यावरील भेगा सबंध रस्त्यावर व रस्त्याच्या मधोमध असल्याने या मार्गावरुन दुचाकीने सावधतेने प्रवास न केल्यास मोठा अपघात होण्याची भीती आहे. सदर रस्ता बांधकाम होऊन केवळ दोनच वर्षे झाले असताना या रस्त्यावरील बांधकाम माहिती फलक देखील गायब करण्यात आले आहे. सदर फलक गायब करण्यात आल्याने या रस्ता बांधकामाविषयक आवश्यक माहिती हेतूपुरस्पर दडविल्या जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
तथापि सदर रस्ता बांधकामात प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत कार्यरत तत्कालीन अभियंता व कंत्राटदारांनी संगनमताने प्रचंड गैरव्यवहार केल्याचा संशय घेत अवघ्या दोन वर्षात सिमेंट रस्त्याला भेगा गेल्याने या रस्ता बांधकामाची चौकशी करुन दोषी विरोधात कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे.