आठवडाभरातच आंतरराज्यीय रस्त्यावरील पॅचेस उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:33 PM2018-12-25T21:33:33+5:302018-12-25T21:33:49+5:30
एका आठवड्यापूर्वी तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सदर पॅचेसची कामे करण्यात आली. सदर काही पॅचेस पुन्हा खड्डेमय झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एका आठवड्यापूर्वी तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सदर पॅचेसची कामे करण्यात आली. सदर काही पॅचेस पुन्हा खड्डेमय झाले आहेत. शहरातील जुने बसस्थानक ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपर्यंतच्या मार्गावर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. शहरातून येथे आंतरराज्यीय मार्ग जातो. सदर कामाची चौकशी करण्याची तसदी संबंधित विभाग घेणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३०० मीटरचा आंतरराज्यीय तुमसर-कटंगी रस्ता ठिकठिकाणी खड्डेमय झाला होता. खड्डे बुजविण्याचे सौजन्य संबंधित विभागाने घेतले. पॅचेसमध्ये गिट्टी भरून डामरीकरण करण्यात आले. आठ दिवसापूर्वी ही कामे करण्यात आली. परंतु काही ठिकाणी पॅचेसमधील गिट्टी बाहेर निघाली असून पॅचेस खड्डेमय झाले आहे. रात्रीला पॅचेस दिसत नाही. त्यामुळे दुचाकी वाहनचालकाचा अपघाताची शक्यता येथे बळावली आहे. तुमसर- कटंगी रस्ता अपघातग्रस्त ठरला आहे. मध्यप्रदेशातील कटंगीकडे हा रस्ता जातो. या मार्गावर मोठी जड वाहतुकीची वर्दळ राहते. क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतुकीमुळे रस्ता खड्डेमय होत आहे.
कटंग रस्ता तुमसर शहरातून जातो. २४ तास येथे वाहतूक सुरु असते. जुना बसस्थानक ते रेल्वे टाऊन व आयटीआयपर्यंत रस्ता मोठा खड्डेमय झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या प्रक्रिया राबविली होती. सध्या पॅचेसमधील काळी गिट्टी बाहेर निघाल आहे. रस्ताभर ती पसरली आहे. परंतु संबंधित विभाग येथे अनभिज्ञ दिसत आहे.
कटंगी मार्गे मॉईलची जड वाहतूक शिवाय खासगी शासकीय बसेस, हलकी वाहने, प्रवासी वाहने, रेतीचे ट्रक याच मार्गाने धावतात. जड वाहतुकीची ट्रक भरधाव येथून धावतात. त्यामुळे पॅचेसमधील गिट्टी इतर प्रवास करणाऱ्यांना धोक्याची ठरली आहे. सदर कामाची चौकशी संबंधित विभागाने करावी असा सूर सध्या शहरात उमटत आहे. रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करतात. अपघात घडल्यास मोठा अनर्थ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केवळ कामे केली जात असल्याचा देखावा केला जात आहे. शासकीय निधीचा गैरवापर होऊन निधी लाटल्याचा प्रकार कदापी खपवून घेतला जाणार नाही. उखडलेले पॅसेच तात्काळ खड्डेमुक्त न केल्यास शहरातील जडवाहतुकीस बंदी करण्यात येईल.
-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.