देव्हाडी उड्डाणपुलाचे बांधकाम नियंत्रणाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:48 PM2018-12-03T21:48:39+5:302018-12-03T21:49:01+5:30
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम नियंत्रणाविना सुरू असल्याचे दिसत आहे. उड्डाणपूल पोचमार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत असूनही संबंधित विभाग व कंत्राटदाराचे येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम नियंत्रणाविना सुरू असल्याचे दिसत आहे. उड्डाणपूल पोचमार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत असूनही संबंधित विभाग व कंत्राटदाराचे येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे. नागपूर येथील मुख्यालयातून बांधकामावर नियंत्रण सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १५ कोटींचा उड्डाणपूल बांधकामावर शासकीय तांत्रिक अधिकारी नियमित राहत नसल्याने उड्डाणपूल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. २४ तास प्रचंड वाहतूक या रस्त्यावर सुरू राहते. वाहतूक कोंडीमुळे रेल्वे फाटकावर उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. चार वर्षापासून संथगतीने उड्डाणपूलाचे कामे सुरू आहेत. उड्डाणपूल मंजूर करण्यात आले. चार वर्षापासून संथगतीने उड्डाणपूलाची कामे सुरू आहेत. उड्डाणपूल बांधकामावर नागपूर येथील कार्यालयातून देखरेख व नियंत्रण केले जात आहे. याकरिता संबंधित विभागाने एका कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती केली आहे. आठ ते दहा दिवसातून ते उड्डाणपूल बांधकामाला भेट देवून जातात. उर्वरित कामे कंत्राटदारांची टीम येथे कार्य करते. यात तांत्रिक तज्ञ किती आहेत हे गुलदस्त्यात आहे.
उड्डाणपूल भरावात फ्लॉश अॅश टाकण्यात आली. ती अॅश पावसाळ्यात वाहून रस्त्यावर पसरली आहे. दोन्ही बाजूचा रस्ता जीवघेणे खड्डेमय बनला आहे. मात्र यावर उपायोजना न करता संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. महत्वपूर्ण रहदारीच्या रस्त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन दिले तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे.
शिवसेनेने दिला तहसीलदारांना अल्टिमेटम
शिवसेनेने सोमवारी तुमसरच्या तहसीलदारांना उड्डाणपूल पोचमार्ग खड्डेमय असून रस्त्यावरील फ्लॉश अॅशची उचल न केल्याबाबत उड्डाणपूलाचे काम बंद पाडून जेलभरो आंदोलन १ डिसेंबर रोजी करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी शिवसेनेचे तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख शेखर कोतपल्लीवार, वाहतूक सेवा जिल्हाध्यक्ष दिनेश पांडे, जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित मेश्राम, उपजिल्हा अध्यक्ष जगदीश त्रिभूवनकर, तालुकाध्यक्ष गुड्डू डहरवाल, विभाग प्रमुख किशन सोनवाने, शाखा प्रमुख हेमंत मेश्रामसह शिवसैनिक उपस्थित होते. निवेदनाची प्रत पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आली. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना शिवसेनेतर्फे निवेदन दिले आहे. यासंदर्भात धुमाळ यांनी प्रोजेक्ट इंचार्ज भन्साली यांना भ्रमणध्वनीवर समस्या सोडविण्याचे निर्देश दिले, परंतु कंत्राटदारांनी दखल घेतली नाही.